Manoj Jarange Patil News: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. यावरून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता मनोज जरांगे पाटील यांना घरी सोडण्यात आले आहे. उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा संतोष देशमुख प्रकरणाकडे वळवला असून, सरकारला इशारा दिला आहे.
कुटुंबाची भेट घेणार, संतोष देशमुख प्रकरणावर लक्ष ठेवून आहे
देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे, न्यायासाठी वणवण फिरत आहे. या प्रकरणात लवकरात लवकर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हायला हवी. देशमुख कुटुंब साधे-भोळे कुटुंब आहे, पण मी लक्ष ठेवून आहे. रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहे. आमच्या पाठीशी समाज आहे. हे प्रकरण आम्ही दाबू देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे कारवाई कधी होईल? मोबाईल कधी मिळणार? चालक कुठे आहे? देशमुख यांना धमकी देणारे कुठे आहेत? घर देणारा, पैसे देणाऱ्यांना सहआरोपी केले का? शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या इन्स्पेक्टरची चौकशी झाली का?, डॉक्टरांची चौकशी केली का? विष्णू चाटेने जो मोबाईल वापरला, तो मोबाईल कुठे आहे? धनंजय मुंडेचे सीडीआर काढले का? असे एकामागून एक प्रश्न विचारत, देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आहे. आरोपी सुटू देऊ नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर करतानाच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी भगवान गडावर जाण्याचा निश्चय बोलून दाखवला. तसेच सर्व पुरावे महाराजांसमोर ठेवणार आहे आणि आता त्यांच्याचकडे न्याय मागणार आहे, असा निर्धार बोलून दाखवला होता. त्यानुसार, संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर पोहोचले. धनंजय देशमुख यांनी महंत नामदेवशास्त्री यांच्यासमोर सगळी कागदपत्रे, पुरावे ठेवले. यावेळी नामदेवशास्त्री यांनी संतोष देशमुख कुटुंबाला शब्द दिला.