Manoj Jarange Patil: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी १३ तारखेपर्यंतचा कालावधी दिला होता. परंतु, ती मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी लाडकी बहीण योजनेसह आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, समाज मला आमरण उपोषण करू नका, असे म्हणत होता. पण हे आमरण उपोषण कठोरपणे करणार आहे. सरकारने मराठ्यांना धोका दिल्याने पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आली आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा. आरक्षण द्यायचे असेल तर बहाण्याची सरकारला गरज नाही. मराठा समाजाच्या मुलांना नोकरभरती, प्रवेश घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
कुणाच्या हरकती असतील तर आम्हाला त्याच्याशी देणे घेणे नाही
आम्हाला सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता तेवढा वेळ आम्ही दिला आहे. आरक्षणाबाबत आम्ही ठाम आहोत. सगेसोयरेची अंमलबजावणी करा. कुणाच्या हरकती असतील तर आम्हाला त्याच्याशी देणे घेणे नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. सुशीलकुमार शिंदे सरकारच्या काळात कायदा केला होता. आता त्यात दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा करा. आम्हाला त्यात हरकत नाही, असे मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितले. मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल. काही पोलीस अधिकाऱ्यांकडून जातीयवाद सुरू आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
१५०० रुपये तीन दिवस पुरणार नाही
मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, धनगरांना आरक्षण द्यायचे नाही. नवीन काहीतरी योजना आणतात, लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी-लाडका मेहुणा योजना आणतील. सरकारने हा डाव टाकलेला आहे. तुम्ही १५०० रुपये देतात ते तीन दिवस पुरणार नाहीत. १५०० रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.