Manoj Jarange Patil: १९ तारखेला अधिवेशन बोलवून त्यात कायदा पारित करा. त्यांचे म्हणणे होते की, फेब्रुवारी महिन्यापर्यंत जाईल. पण त्यांना नाही म्हणालो आहे. हे चर्चेचे गुऱ्हाळ चालत राहणार आहे. वेळकाढूपणा होऊ शकतो. आपण सावध राहायला हवे. त्यामुळे २० तारखेला मुंबईला जाणारच. मुंबईला गेल्यावर चर्चा सगळी बंद होईल. मग सगळे सोयीस्कर होईल. सरकार जर सुतासारखे सरळ करायचे असेल, सरकारला आडमुठी भूमिका सोडायला लावायची असेल, तर मराठ्यांना २० तारखेला मुंबईकडे जावेच लागेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. २० तारखेला मराठा समाजातील बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत. कोट्यवधी मराठा आंदोलक मुंबई धडकणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मीडियाशी बोलताना मनोज जरांगे यांनी सांगितले की, सापडलेल्या ५४ लाख नोंदींवर तातडीने प्रमाणपत्र वितरीत करण्याचा मुद्दा चर्चेत आला. ग्रामपंचायतींमध्ये त्याची यादी लावणे आणि सगेसोयरे शब्दाविषयीही आमची सरकारबरोबर चर्चा झाली. मागेल त्याला मराठ्याला आरक्षण यावरही चर्चा झाली. तसे त्यांना लिहूनही दिले आहे. सापडलेल्या नोंदी अपलोड करून ठेवायला हवे. गावनमुन्याच्या नोंदीही घेण्याबाबत चर्चा झाली. हे सगळे २० तारखेच्या आत करा असे आम्ही सांगितले आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
मुंबईला २० जानेवारीला जायचे म्हणजे जायचे
सगेसोयरे शब्दावर शासननिर्णय किंवा कायदा पारित करण्यासंदर्भातही सांगितले आहे. आता बघू काय करतात. पण काहीही होवो, मुंबईला २० जानेवारीला जायचे म्हणजे जायचे. आशेवर कुणीही राहायचे नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. आम्ही स्पष्टच सांगितले. ज्याची नोंद मिळाली, त्याच्या रक्ताच्या सगेसोयऱ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. तरच तुमचे-आमचे जमेल. नाहीतर नाही जमणार. नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगेसोयऱ्यांना लाभ मिळायला हवा. त्यासाठी शासननिर्णय किंवा कायदा पारित केल्याशिवाय ते होणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, दररोज ९० ते १०० किमीचा प्रवास करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी चालायचे, इतरांनी गाडीत बसून प्रवास करायचा आहे. ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी त्या मुक्काम स्थळाच्या शेजारी असलेल्या गावकऱ्यांकडून जेवणाची सोय होणार आहे. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये असणार आहे. प्रत्येक मुक्काम डोंगरात असणार आहे. गावात कोणताही मुक्काम असणर नाही. मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवा. सर्वांनी मुंबईकडे चला, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.