Manoj Jarange Patil News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची भाषा दोनदा केली आहे. याचा अर्थ असा की, यामध्ये त्यांचाच दोष आहे. या राज्याचे राज्यकर्ते आहेत. सगेसोयरेची अंमलबजावणी रोखली. हे नाकारून चालणार नाही. मराठ्यांचा द्वेष सोडून द्या. छगन भुजबळांचे ऐकू नका. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या विरोधात आंदोलन करायला लावली, या शब्दांत मनोज जरांगे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे याची मला कल्पना आहे. जर एकनाथ शिंदे यांनी सांगितले, मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचाय, पण त्यांच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असेल. तर मी त्याच क्षणी राजीनामा देईन आणि मी राजकारणाचा संन्यास घेईन, असे मोठे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांची पाठराखण केली होती. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी याला प्रत्युत्तर दिले होते.
२०२४ मध्ये भाजपाला सर्वाधिक फटका बसेल, मोठा पश्चात्ताप होईल
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. भाजपाचे काही पदाधिकारी येतात आणि सांगतात की, आमची फसगत झाली. आम्ही समाजाचे राहिलो नाहीत आणि पक्षाचे राहिलो नाहीत. तुमच्याबरोबर नाईलाजाने राहिले आहेत. तुम्ही जे गणित मांडले आहे ना? तुमच्या आयुष्यातील सर्वांत मोठा फटका तुम्हाला २०२४ च्या निवडणुकीत बसणार आहे. हा माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातला सर्वांत मोठा पश्चाताप तो असणार आहे, असे भाकित मनोज जरांगे यांनी केले.
दरम्यान, राज्यातील शेतकरी आणि मराठा समाजाला शेवटी सहन होईल तोपर्यंत होईल. सरकारला काय करायचे ते करुद्या. काय गुन्हे दाखल करायचे ते करुद्या. देवेंद्र फडणवीस यांना काय दादागिरी करायची ते करुद्या. मराठा समाजाचे काही आमदार आमच्या अंगावर घालायचे ते घालूद्या, पण निवडणुकीत त्यांना पाडायचे, असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.