दोन दिवसापूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या प्रकरणी आज महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता. यावेळी ठाकरे गट आणि राणे समर्थक समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले आणि दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान,आता मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जरोंगे पाटील यांनी यावेळी महायुती सरकारवर टीकाही केली. जरांगे पाटील म्हणाले, '१ सप्टेंबर रोजी आम्ही मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे, त्याची पाहणी करणार आहे. मालवण हा कोणाचा बालेकिल्ला असं काही नाही,छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी दैवत आहे'.
"हे स्मारक कोसळल्यामुळे अठरापगड जातींच्या भावना दुखावल्या आहेत. हा आमच्यासाठी धक्कादायक विषय आहे. आम्ही आमच्या राजासाठी राजकोट किल्ल्याला भेट दिली पाहिजे, हे माझ्या मनात आलं. म्हणून आम्ही भेट देणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. "छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे,या प्रकरणात राजकारण केलं नाही पाहिजे. राजकारणासाठी आणखी जागा आहे'. यावेळी पत्रकारांनी जरांगे पाटील यांना राणेंच्या बालेकिल्ल्यात जाणार का असा प्रश्न केला. यावेर बोलताना पाटील म्हणाले, कोण कोणाकडे येणार आणि कोण कोणाकडे जाणार याच्यात आम्हाला रस नाही,असंही जरांगे म्हणाले.
"स्मारक पडलं याचं आम्हाला वाईट वाटत आहे. बांधकाम करणारा कोण आहे? यात आता उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे. ज्याने काम केलं त्याचा हा दोष आहे. याच्यात राजकारण नको आहे असं आमचं म्हणणं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.