Laxman Hake ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही आरक्षण प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "मनोज जरांगे हे कोणत्याही स्थितीत उमेदवार उभे करणार नाहीत. उमेदवार उभं करणं एवढं सोपं आहे का? जोपर्यंत गोविंदबागेतून शरद पवार हे स्क्रिप्ट पाठवणार नाहीत तोपर्यंत जरांगे उमेदवार देणार नाहीत," असा टोला हाके यांनी लगावला आहे.
मनोज जरांगे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, "शरद पवारसाहेबांना कळून चुकलं आहे की, महाराष्ट्रातला ओबीसी आता एकवटला आहे, तो आपल्याला मतदान करणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे हे उमेदवार उभे करणार नाहीत. ते आता आराम करतील. त्यामुळे ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे की, ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगेंच्या बेकायदेशीर मागण्यांना पाठिंबा दिला, त्यांना मोठं केलं त्या लोकांना आपल्याला खड्यासारखं बाजूला करायचं आहे आणि लोकसभेला जी चूक झाली ती आता दुरुस्त करायची आहे," असं आवाहनही हाके यांनी केलं आहे.
मनोज जरांगेंची विधानसभेबाबत भूमिका काय?
विधानसभा उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी आपल्या सहकाऱ्यांची अंतरवाली सराटी इथं बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही जागांबाबत प्राथमिक चर्चा झाली. यामध्ये आपण ज्या जागा जिंकू शकतो, अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांचा पराभव करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.