Manoj Jarange Patil News: सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीत कोणाला पाडणार, याबाबत लक्ष्मण हाकेंनी घोषणा केली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.
मनोज जरांगे दसरा मेळावा घेणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भात मनोज जरांगे यांनी माहिती दिली. आता माझी तब्येत ठीक आहे. रुग्णालयातून सुट्टी घेऊन अंतरवालीकडे जाणार आहे. दसरा मेळाव्याचे नियोजन करायला जाणार आहे. अठरापगड जातींच्या लोकांचा उत्सव आहे. गडावर पूर्ण तयारी सुरू आहे. ५२ हजार स्वयंसेवक आहेत. मराठा समाजाची इच्छा होती, मराठ्यांचा मेळावा झाला पाहजे, तो आता होत आहे. गडावर जेवण व्यवस्थेची तयारी सुरू आहे. वैद्यकीय सुविधा, पाण्याची सुविधा, महिलांसाठी सोयी-सुविधा अशा सगळ्या सुविधा करण्याची तयारी सुरू आहे. आता सगळ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
विविध ठिकाणी देणार भेटी
रुग्णालयातून सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भेटी देणार असल्याचे समजते. तसेच अनेक ठिकाणी बैठका घेणार आहेत. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरही बैठका घेतल्या जाणार आहेत. एखादी व्यक्ती समाजाचा मेळावा डावलून पक्षाकडे जात असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, आम्हाला राजकारणात जोडू नका. एकत्र करून मोट बांधली म्हणत असाल मात्र आम्ही डाव टाकला तर मोट उलटली असेल. मराठे तुम्हाला रसातळाला मिळवतील. मराठा नेत्यांनी तुमच्या नेत्याला, देवेंद्र फडणवीसाला समजून सांगा मी राजकारणाचा एक शब्द काढणार नाही. मला महायुती, आघाडीत काही घेणे देणे नाही. भाजपा नेता आरक्षण देत नसेल तर समाजाचे वाटोळे करणाऱ्यांच्या सोबत राहू नका, असे जरांगे म्हणाले.