बुलढाणा – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यभरात पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्यात विविध जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरला आहे. बुलढाणा येथे आज मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने पल्लवी जरांगे यांनी आक्रमकपणे भाषण करत सभा गाजवली.
पल्लवी जरांगे पाटील म्हणाल्या की, आज मराठा समाज स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. का तर आरक्षण नाही. आम्ही काय पाप केलंय त्यामुळे आम्हाला आरक्षण नाही. १५ वर्षे ओबीसी समाजाला आरक्षण आहे. आज माझा बाप १६ दिवस झाला समाजाच्या आरक्षणासाठी उपाशी जालना इथं आंदोलनाला बसलाय, अन्न नाही पाणी नाही कारण समाजाला आरक्षण नाही. आम्ही मराठा समाजात जन्म घेतला म्हणून काय पाप केले की गुन्हा केलाय? मराठा समाजात जन्म घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. माझा बाप ४ लेकरांचा बाप नाही तर समाजाचा बाप आहे. आज समाजातील लेकरांसाठी तो उपोषणाला बसला आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आरक्षण आमचा हक्क आहे. आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजेत. आंदोलन शांततेत सुरू असताना तुम्ही लाठीचार्ज करता. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते आंदोलन उठणार नाही. आमचा मराठा सहजासहजी पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही. आमच्या मराठ्यांच्या नादी लागायचे काम नाही. आम्ही साधी शेतकरी कुणबी मराठा, शांततेत सुरू असलेले आंदोलन तुम्ही लाठीचार्ज करता, लहान लेकरं पाहत नाही. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढतोय, आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे असं पल्लवी जरांगे पाटलांनी व्यासपीठावरून भाषण केले.