रविवारी राज्य शासनाकडून राजपत्र आणि मराठा आरक्षणाचा मसुदा घेऊन मराठा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर लाखोंच्या संख्येने आलेले मराठा आंदोलक आपापल्या गावी परतले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी देखील अंतरवाली सराटीमध्ये पोहोचताच घरी न जाता आंदोलनस्थळी समाजाच्या लोकांची सभा बोलविली होती. यामध्ये त्यांनी चार महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर होणार आहे. कायदा करण्यासाठी अधिसूचना गरजेची आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. विरोधकांना हरकती घेऊ द्या आपण सकारात्मक बाजू सांगावी. विरोध करणाऱ्यांना शांततेत उत्तर द्या. मराठ्यांसाठी कायदा फायदेशीर हे सोशल मीडियावरही सांगा, असा संदेश जरांगे यांनी मराठा समाजाला दिला आहे.
मला माझा समाज महत्त्वाचा आहे कुठलाही नेता महत्त्वाचा नाहीय. काही लोक मराठा समाजाचे आंदोलन मुद्दाम चिघळण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन संपले नाही तात्पुरते स्थगित केले आहे, असेही जरांगे यांनी मराठा समाजाच्या लोकांसमोर स्पष्ट केले आहे. तसेच आंदोलन सुरु ठेवायचे की नाही असेही जरांगे यांनी उपस्थितांना विचारले, तेव्हा तेथील लोकांनी आंदोलन सुरुच ठेवायचे, असे सांगितले. समाजाच्या भल्यासाठी रक्त सांडलेय. आता शेपूट राहिलेय, असेही जरांगे म्हणाले.
अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. उद्या रायगडावर जाण्यासाठी निघणार असून 30 तारखेला शिवरायांना अभिवादन करणार आहोत. प्रत्येक मराठ्याला प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय माघार नाही. सगेसोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाची उद्यापासून अंमलबजावणी करावी. मराठ्यांनी 100टक्के आंदोलन जिंकले आहे. कालचा अध्यादेश ओबीसी व मराठा या दोघांसाठी आहे. परिपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही. पहिले प्रमाणपत्र मिळाल्यावर भव्य विजयसभा घेणार, असेही जरांगे म्हणाले.