भिवंडी : भिवंडी महापालिकेतील सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची हत्या महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे तपास करावा. पोलिसांनी म्हात्रे कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला पाहिजे. म्हात्रे यांच्या निधनाने भिवंडी काँग्रेस पक्षाचे व येथील सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व हरपले आहे. येत्या अधिवेशनात या प्रकरणी आम्ही प्रश्न उपस्थित करणार आहोत, असे आश्वासन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भिवंडीत दिले.चव्हाण यांनी बुधवारी म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. म्हात्रे यांची पत्नी वैशाली व मुलगी हर्षाली यांच्याशी चर्चा केली. पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्याकडून पुढील तपासाबाबत माहिती घेतली. तसेच म्हात्रे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, असे त्यांनी सांगितले. या वेळी माजी खासदार सुरेश टावरे, दामू शिंगडा, माजी आमदार रशीद ताहीर, योगेश पाटील, शहराध्यक्ष शोएब खान, इम्रान खान यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)आरोपीच्या घरावर छापामनोज म्हात्रे यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी प्रशांत म्हात्रे यांच्या कालवार येथील बंगल्यावर तालुका पोलिसांनी छापा टाकला. तेथून सुमारे दीड लाखाच्या ५५२ विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मनोज म्हात्रे हत्येचा प्रश्न अधिवेशनात विचारणार
By admin | Published: February 23, 2017 4:35 AM