विभागीय आयुक्तांच्या हस्ते प्रदान : द्वितीय पुरस्कार आदिवासी आयुक्तालयालानागपूर : नागपूर महापालिकेने स्मार्ट सिटी, स्मार्ट प्रशासन, स्मार्ट सिस्टम ही ई-गव्हर्नन्स कार्यप्रणाली अवगत केल्यामुळे जनतेला लोकाभिमुख व पारदर्शी प्रशासन देत आहे. महापालिका सोशल मीडिया, ई-गव्हर्नन्स प्रणालीचा उपयोग करून चांगल्या सेवा देत असल्याबद्दल राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरली आहे, असे मत विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी व्यक्त केले. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार २०१३ चा पुरस्कार वितरण सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून विभागीय आयुक्त उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभियानाचा प्रथम पुरस्कार नागपूर महापालिकेला मिळाला असून, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार उपप्रादेशिक आदिवासी आयुक्त विभागाने पटकाविला. विभागीय आयुक्तांच्या हस्ते महापौर अनिल सोले व मनपा आयुक्त श्याम वर्धने यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आदिवासी विभागाचे आयुक्त रमेश पाटील यांनी स्वीकारला. पुरस्काराप्रति आपले मनोगत व्यक्त करताना महापौर म्हणाले की, कर्तव्यभावनेतून सेवा व कार्य केल्यास कामाचे गुणात्मक मूल्यांकन होते. ई-गव्हर्नन्स कार्यप्रणालीचा वापर करून जनतेला त्यांच्या गरजा व मूलभूत सेवा अधिक गतीने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करायचे आहे. त्याकरिता जनतेचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. प्रशासनात स्मार्टनेस वाढविल्यास लोकांचा प्रशासनाप्रति विश्वास वाढेल. याप्रसंगी आयुक्त श्याम वर्धने म्हणाले की, शहरात २५ लाख नागरिक राहतात. त्या सर्वांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरविण्याचे काम मनपा करीत आहे. ई-गव्हर्नन्स कार्यप्रणाली अमलात आणून आॅनलाईन सेवा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्या सेवेचा बहुसंख्य नागरिक लाभ घेत आहेत. कार्यक्रमाला उपमहापौर जैतुनबी अन्सारी, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, विभागीय पुरवठा अधिकारी मावस्कर, अति. उपायुक्त प्रमोद भुसारी, मनपाचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, आदिवासी विकास आयुक्त विनोद पाटील, मुरलीधर मेश्राम, रमेश सिंगारे, भूषण शिंगणे, सत्यभामा लोखंडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)
मनपाला राजीव गांधी गतिमानता पुरस्कार
By admin | Published: July 25, 2014 12:51 AM