मुंबई : जागतिक पातळीवर सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आघाडीवर असलेले उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. या स्फोटकांसह धमकीचे पत्रही होते. या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला असून, ATS ने आपल्या प्राथमिक अहवालात हिरेन यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत काही धक्कादायक खुलासे केल्याचे सांगितले जात आहे. (mansukh hiren death case maharashtra ats theory and 5 shocking points)
ATS गोळा केलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन दोन मोबाईल वापरत होते. मृत्यूपूर्वी दोन्ही मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वीच ऑन आणि स्वीट ऑफ करण्यात आले. एका मोबाईचे लोकेशन वसईतील मांडवी तर दुसऱ्याचे लोकेशन तुंगारेश्वर असून, दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ आणि स्वीच ऑन होण्याआधी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय एटीएसकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास NIA कडे; एटीएसने केले स्पष्ट
पुरावे नष्ट करण्यास मिळाला वेळ
दुसरे म्हणजे आत्महत्या करणारी व्यक्ती कोरोनाच्या भीतीने तोंडावर मास्क किंवा रुमाल लावते, हे न पटणारे आहे. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाली असावी, हा संशय बळावतो आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तोंडावाटे पाणी शरीरात जाऊन काही वेळातच मृतदेह पाण्यावर तरंगला असता, यासाठी मनसुख हिरेन यांच्या तोंडात रुमालाचे बोळे होते. यामुळे मारेकऱ्यांना पसार होण्यास आणि पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळाला, असे सांगितले जात आहे.
तपास यंत्रणा भरकटवण्यासाठी केलेला भाग
हिरेन यांचा मृत्यू त्यांचा मृतदेह पाण्यात फेकण्याच्या १२ ते १६ तास आधी झाला असावा, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल ऑन ऑफ करण्याचे तंत्र हा तपास यंत्रणा भरकटवण्यासाठी केलेला भाग असावा, असा संशय एटीएसच्या अधिकाऱ्यांना आहे, असे म्हटले जाते आहे.
दरम्यान, हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र एटीएसने गुन्हा नोंद केला आहे. मात्र, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांसंदर्भातील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडेच राहणार आहे, असे एटीएसकडून स्पष्ट करण्यात आले.