मुंबई : दांडिया आणि गरब्याच्या तालावर नऊ दिवस फेर धरल्यानंतर दसऱ्याचे वेध लागतात. दसऱ्यानिमित्त शहर उपनगरातील बाजारांमध्ये लगबग दिसू लागली आहे. त्यामुळे बाजारात झेंडुला झळाळी आली आहे.दसरा अर्थात ‘विजयादशमी’ या हा दिवस आनंदाचा म्हणून दारी पारंपरिक पद्धतीनुसार झेंडूची तोरणे लावण्यात येतात. त्यामुळेच सध्या बाजार झेंडुमय झाला आहे. दादर फुलमार्केट, घाटकोपर, भांडुप, मुलुंड या ठिकाणी झेंडूची फुले, आंब्याची डहाळ, धान्यांचे तुरे पाहायला मिळत आहेत. यातही झेंडुमध्ये साधा झेंडू, कलकत्ता झेंडू असे प्रकार असून यातील कलकत्ता झेंडूला विशेष मागणी असते. साधारण ४ ते ५ हजार किलो झेंडुची फुले आज (सोमवारी) बाजारपेठेत दाखल होणार आहेत. यंदा आवक चांगली आहे, मात्र बाजारातील प्लास्टिकच्या झेंडूच्या तोरणांमुळे झेंडूची फुले घेणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे अशी खंत फुलविक्रेते सुदर्शन मंडलिक यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
दसऱ्याच्या तोंडावर झेंडूला झळाळी!
By admin | Published: October 10, 2016 6:06 AM