ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 21 - थोड्याशा पावसाचा फटका बसून मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा रखडल्याने मुंबईकरांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. अनेक प्रवासी गाडीत व स्टेशनवर अडकून पडले. मात्र त्यातही मुंबईकरांची माणुसकी जिवंत असल्याचे एका उदाहरण म्हणजे, रखडलेल्या लोकलमध्ये पुरूषांनी एका महिलेची प्रसूती केली. दिवा येथे राहणा-या गुडिया प्रमोद गुप्ता या मंगळवारी सकाळी जे जे रुग्णालयात जात होत्या, मात्र त्यांनी भांडुप रेल्वे स्थानकात लोकलमध्येच एका गोंडस मुलीला जन्म दिला.
गुडिया प्रमोद गुप्ता यांची आज जे जे रुग्णालयात तारीख असल्याने त्या सीएसटीला चालल्या होत्या. मात्र सकाळपासूनच विस्कळीत असलेल्या मध्य रेल्वेचा फटका त्यांना बसला. सकाळपासून खूप वेळ लोकलची वाट पाहत त्या दिवा स्थानकावर उभ्या होत्या. मात्र गर्दीमुळे त्यांना कोणत्याच गाडीत चढता आले नाही. अखेर दिवा येथून सीएसटीच्या दिशेने जाणा-या लेडिज स्पेशल गाडीत चढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र प्रचंड गर्डीमुळे त्यांना लेडीज डब्यात चढता आले नाही. तसेच काही डब्यात पुरूषांनी जागा अडवली होती. अखेर त्या माल डब्यात चढल्या. मात्र लोकल मुलुंड ते भांडूपदरम्यान पोहोचली असताना कळा वाढल्याने तेथील पुरूषांनीच त्यांची प्रसूती केली व गुडिया गुप्ता यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ व आईची प्रकृती स्थिर असून दोघांनाही भांडूपच्या सावित्रीबाई रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.