मुंबई : पीएम केअर्स निधीतून महाराष्ट्राला जवळपास २०९१ व्हेंटिलेटर मिळाले आहेत. मात्र, त्यातील तब्बल २७६ व्हेंटिलेटर विविध त्रुटींमुळे बंद असल्याचे आढळले आहे, तर २३९ व्हेंटिलेटर वापराविना पडून असल्याचे लोकमतच्या चमूने राज्यभरातून मिळविलेल्या माहितीत आढळले आहे. बहुतांश बंद व्हेंटिलेटरना ऑक्सिजन सेन्सर, कनेक्टरच नसल्याने ते वापरण्यायोग्य नाहीत. शिवाय, काहींची आयसीयूत वापरण्याची क्षमता नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. अनेक व्हेंटिलेटरमध्ये फ्यूज नसणे, वायर तुटणे, सिग्नल नसणे अशाही त्रुटी आढळल्या आहेत.नाशिकमध्येही गोंधळनाशिकमध्ये गेल्या महिन्यात ६० नवे व्हेंटिलेटर पाठविण्यात आले. परंतु, त्याला स्टँड, सेन्सर अन्य साहित्य नाही. महापालिकेने नोएडास्थित कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, कंपनी दाद देत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. कोल्हापूरमध्ये व्हेंटिलेटर पुरवठा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे.
विदर्भात सर्वाधिक १९१ व्हेंटिलेटर बंदविदर्भात सर्वाधिक १९१ व्हेंटिलेटर निरुपयोगी ठरले आहेत. वर्धा जिल्ह्याला ३२ व्हेेंटिलेटर मिळाले होते. १५ सांगलीला पाठविण्यात आले. उर्वरित १७ सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहेत.
मराठवाड्यात १७४ व्हेंटिलेटर बिनकामाचेमराठवाड्यातील जिल्ह्यांना पीएम केअरमधून मिळालेल्या व्हेंटिलेटरची अवस्था म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयास प्राप्त १५० पैकी ‘धमन-३’ची ५० व्हेंटिलेटर सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीत पडून आहेत. या व्हेंटिलेटरची खोकीही उघडण्यात आलेली नाहीत.