अजित पवार लवकरच मोठा धमाका करणार? भाजपला जोरदार धक्का देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 07:40 PM2021-09-17T19:40:26+5:302021-09-17T19:42:12+5:30
पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना पवारांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. पुण्यातले काही भाजप नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी अजित पवार भाजपला धक्का देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्त्वाखाली लढली जाणार आहे. पुण्यातील भाजपचे काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. पण मी खालच्या पातळीवरचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिलेली आहे. पालिका हाती असल्यास चांगलं काम करता येतं, असं अजित पवार म्हणाले.
'भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे असताना सर्वकाही सुरळीत होतं'
विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवूनच आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक वर्षे काम केलं. पण २०१३-१४ मध्ये देशात नरेंद्र मोदींची हवा होती. त्यामुळेच चांगलं काम करूनही आम्हाला पराभव पत्करावा लागला. मात्र आता भाजपचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. ज्यांना यायचं आहे, त्यांनी अपात्र ठरता कामा नये, असं मी त्यांना सांगितलं आहे. कारण अपात्र ठरल्यावर ६ वर्षे निवडणूक लढवता येत नाही. आत्ता जे पक्षात आले आहेत, ते अपक्ष आहेत. असेही काही जण संपर्कात आहेत, ज्यांचे पती नगरसेवक आहेत किंवा पत्नी नगरसेविका आहे तर तिचे पती पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा पवारांनी केला.