काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचे लवकरच राजीनामे; अनेकजण भाजपात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 08:58 AM2019-07-18T08:58:31+5:302019-07-18T09:49:31+5:30
महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट
सोलापूर : 'राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून लवकरच ते राजीनामे देऊन भाजपमध्ये दाखल होतील,' असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
सोलापुरात आल्यानंतर ते बोलत होते. भाजपमध्ये प्रवेश करण्यास राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यानंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तत्पूर्वी असे इच्छुक आमदार आपले राजीनामे सादर करतील, नंतर त्यांना भाजपात घेतले जाईल. राजीनामे सादर करणाऱ्या आमदारांची नावे लवकरच पुढे येतील, असेही ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यातील असे आमदार संपर्कात आहेत का, असे विचारले असता महसूल मंत्री पाटील म्हणाले, बरेच जण आहेत. त्यांची नावे आत्ताच सांगता येणार नाहीत. अशा आमदारांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यास निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की योग्य वेळ आल्यानंतर सर्वांना न्याय दिला जाणार आहे. कोणावर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. निवडून येण्याची क्षमता पाहूनच पावले उचलली जात आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही 7 उमेदवार बदलले. ते सर्व जण निवडून आले. विधानसभेसाठी 220 जागा निवडून आणायच्या निश्चयाने आम्ही रचना करीत आहोत.
भाजप-सेना युती होईल का, असे विचारले असता ते म्हणाले की आमचं ठरलेलं आहे. मात्र काय ठरलं आहे, हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच माहिती आहे. लवकरच तो फॉर्म्युला बाहेर येईल आणि यशस्वी होईल. जिथे स्थानिक आमदार आहे, ती जागा त्याच पक्षाला राहील. इतर जागावाटपाबाबत लवकरच निर्णय होईल.