पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅगचा वापर वाढविण्यासाठी फास आवळण्यास सुरूवात केली आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांना यापुढे टोलनाक्यांवर मिळणारी रिटर्न टोलमधील सवलत, मासिक पास, स्थानिक नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे सवलती हव्या असतील तर वाहनाला फास्टॅग लावावाच लागणार आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी या महामार्गांवर एक किंवा दोन लेन ठेवण्यात आल्या आहेत. सुरूवातीला दि. १ डिसेंबरपासूनच फास्टॅगची सक्ती केली जाणार होती. पण फास्टॅगच्या अनुपलब्धतेमुळे ही मुदत दि. १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर पुन्हा महिनाभरासाठी वाहनचालकांना दिलासा देण्यात आला आहे. मात्र, आता दि.१५ जानेवारीपासून महामार्गांवर फास्टॅगची सक्ती करण्यास सुरूवात झाली आहे. तसेच ‘एनएचएआय’कडून फास्टॅगचा वापर वाढविण्यासाठी सवलतीही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक सर्व टोल व्यवस्थानाकडे पोहचले असून पुढील एक-दोन दिवसांत त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याची माहिती पुणे-सातारा महामार्ग टोल व्यवस्थापनाकडून देण्यात आली.सध्या टोलनाक्यांवर परतीच्या प्रवासासाठी एका बाजूच्या टोलमधून कारसाठी जवळपास ५० टक्के सवलत दिली जाते. खेड-शिवापुर टोलनाक्यावरून साताराच्या दिशेने जाण्यासाठी ९५ रुपये टोल आहे. परतीच्या प्रवासाचा (रिटर्न) टोल दिल्यास १४० रुपये लागतात. याचाअर्थ वाहनचालकांना ५० रुपयांची सवलत दिली जाते. टोलनाक्यापासून २० किलोमीटर अंतरातील स्थानिक वाहनांना २६५ रुपयांता महिनाभर कितीही वेळा टोलनाक्यावरून ये-जा करता येते. तसेच इतर वाहनचालकांना मासिक पाससाठी ३ हजार व ६ हजार रुपये असे दोन पर्याय आहेत. या शुल्कामध्ये टोलनाक्यावरून अनुक्रमे ५० व १०० वेळा ये-जा करता येते. दररोज २ ते अडीच हजार वाहने मासिक पासमधून मिळणाऱ्या सवलती घेतात. तर रिटर्न टोल भरणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे, असे टोल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. -----------------------
फास्टॅगचा फास आवळण्यास सुरुवात; टोलनाक्यांवर मिळणाऱ्या सवलती होणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 8:02 PM
सवलती हव्या असतील तर वाहनाला फास्टॅग लावावाच लागणार...
ठळक मुद्देदेशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरणे बंधनकारक सध्या फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी या महामार्गांवर एक किंवा दोन लेन दररोज २ ते अडीच हजार वाहने मासिक पासमधून मिळणाऱ्या सवलती घेतात