मुंबई - भाजपा येण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार, खासदार बरेच इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतील पक्षात पुढच्या काळात खिंडार पडणार नाही. २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा लढवण्यासाठीही मविआकडे उमेदवार शिल्लक राहणार नाही. प्राथमिक पातळीवर अनेकांशी चर्चा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारच्या विकासकामावर जनतेचा विश्वास बसत आहे. भारत जोडो यात्रेवेळीच १५०० काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. आगामी काळात प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार आहे. अनेकांना धक्के बसतील. जनताही आश्चर्यचकीत होईल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीबाबत भाजपा-शिंदे यांच्यात नाराजी नाही. प्रत्येक ठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित निर्णय घेत आहेत. नागपूरचा उमेदवार ठाकरे गटाला दिल्याने मविआत भांडणे सुरू आहे. ठाकरेंना उमेदवारी दिल्यावर काँग्रेस नेत्यांनी बैठक घेण्याचं कारण काय? आमच्याकडे भांडणे नाहीत. कोकणाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मी आणि उदय सामंत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. आमच्याकडे धुसफूस नाही तर मविआकडे धुसफूस आहे असं त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनाच स्वपक्षातील लोकच सोडून जातातउद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपद राहते की जाते हे निवडणूक आयोगाच्या कक्षेत आहे तेच होईल. मुंबईला उद्धव ठाकरेंनी पाण्यात बुडवले. मुंबईसाठी शिंदे-फडणवीस सरकारने काही विकासकामे आणली आहे. त्याचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होईल. शिवसेना संपवण्यासाठी मोदींना मुंबईत येण्याची गरज नाही. आम्ही छोटे कार्यकर्तेच पुरेसे आहोत. त्यांच्याकडील राहिलेले आमदार, खासदारच पुढील काळात आमच्याकडे येतील. संजय राऊतांमुळे अनेक आमच्याकडे येतील आणि काही शिंदेंकडे जातील. संजय राऊतच शिवसेना संपवण्यासाठी पुरेसे आहेत. उद्धव ठाकरेंचे आमदारच स्वत:ला सांभाळायला येत नाही ते मित्रपक्षांना कसे सांभाळतील. पक्षाचे लोक तुम्हाला सोडून जातात दुसरे तुमच्याकडे का येतील? असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंना जमत नाहीउद्धव ठाकरे केवळ निवडणुकीपुरतं जवळ येतील आणि त्यानंतर दूर जातील हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. स्वार्थासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित आलेत. भाजपा-शिंदे गट आणि अजून कुणी पक्ष आमच्यासोबत येतील त्यांना योग्यप्रकारे न्याय देणे, सन्मान देणे हे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना जमते. ते उद्धव ठाकरेंना जमत नाही. ते कधीच युतीला न्याय देऊ शकत नाहीत असं बावनकुळे यांनी सांगितले.
वाचाळवीर कोण हे महाराष्ट्राला माहितीवाचाळवीर कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही हे अजितदादांना सभागृहात बोलणे शोभतं का? ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते हे मान्य आहे मग धर्मवीर नव्हते हे का म्हटलं? तुम्ही अपमान करतायेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवाचे हाल झाले पण कधीही त्यांनी धर्मासाठी तडजोड केली नाही. धर्मवीर नाही याला भाजपाला आक्षेप नाही. भाजपाने कधी महापुरुषांचा अपमान केला नाही. महापुरुषांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी. संस्कृती जपणे ही आमची जबाबदारी आहे असं बावनकुळेंनी म्हटलं.