आदेश रावलनवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसबरोबर आहेत. तथापि, राष्ट्रवादी व शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत समझोता करण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस नेतृत्वाकडे याबाबतच्या भावना पोहोचवण्यात आल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्याशी समझोता करण्यात काहीही अडचण नाही, अशी पक्षातील चर्चा आता पुढे आली आहे; परंतु जेव्हा जागावाटपावर चर्चा होईल, तेव्हा ते विचारतील की, आपल्याला किती जागा पाहिजेत? विरोधकांमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष आहे, असे असले तरी हे घडू शकते. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी अनेकदा म्हटलेले आहे की, माझ्यात व राहुल गांधी यांच्यात काय फरक आहे? राहुल गांधी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नातू आहेत आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू आहे. तथापि, काँग्रेसला वाटते की, आंबेडकर यांनी आपल्या अटींमध्ये थोडासा लवचिकपणा आणला तर चर्चा होऊ शकते.