"शरद पवार अन् अजितदादांच्या भेटीत अनेक रहस्य, ते लवकरच..."; रवी राणांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 01:46 PM2023-11-11T13:46:22+5:302023-11-11T13:46:56+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.
मुंबई-
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. यात आता आमदार रवी राणा यांनी केलेल्या विधानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अजितदादा आणि शरद पवार यांच्या भेटीत अनेक रहस्य आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. शरद पवारांनी मोदींसोबत यावं यासाठी अजितदादा अजूनही प्रयत्नशील आहेत, असं रवी राणा म्हणाले. अजित पवारांच्या दिल्लीवारीबाबत ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
"अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास कामांना ज्या पद्धतीनं पाठिंबा देत विकासाला साथ दिली. तशीच शरद पवार यांनीही द्यावी यासाठी अजितदादा अजूनही प्रयत्नशील आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीत अनेक रहस्य आहेत. मला ठाम विश्वास आहे की शरद पवारही पंतप्रधान मोदींच्या विकास कामांनी प्रभावित होऊन लवकरच त्यांना पाठिंबा देतील. लवकरच अशा प्रकारचं चित्र तुम्हाला पाहायला मिळू शकतं", असं रवी राणा म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
दरम्यान, अजित पवारांसोबतच्या भेटीबाबत वेगवेगळ्या चर्चा होत असताना खुद्द शरद पवार यांनी आपली बाजू मांडली आहे. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार असतात. वेळप्रसंगी त्यांना संकटांनाही तोंड द्यावे लागते. मात्र आयुष्यातील काही दिवस असे असतात की, या सर्व संकटांना विस्मरण करून आनंदाने कुटुंबाच्यासमवेत दिवस घालवावं जगावे, अशी इच्छा असते, असं म्हणत पवारांनी सूचक विधान केलं. महाराष्ट्रासह संबंध देशात लोक आनंदाने दिवाळी साजरी करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला हा दिवाळीचा सण त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी येऊ व पुढील इच्छा आकांक्षांना यश मिळो, अशा शुभकामना दिवाळीनिमित्त शरद पवारांनी व्यक्त केल्या.