सावंतवाडी - पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चष्माचा कारखाना आणण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल. त्यांच्या या घोषणेचे स्वागत केले पाहिजे तसेच त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. ते सावंतवाडी येथे बोलत होते. यावेळी त्यांनी नगरपालिकेला पंधरा दिवसात मुख्याधिकारी द्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषणाला बसू, असा इशाराही साळगावकर यांनी शासनाला दिला आहे.
यावेळी साळगावकर म्हणाले, माझा लढा बेरोजगारांसाठी आहे. आज जिल्ह्यात बेरोजगारी वाढत आहे. कोणताही नवा प्रकल्प आला की त्याला विरोध होत असतो. एखाद्या प्रकल्पाला विरोध केला की झाले, पण त्या प्रकल्पाला आपण कशासाठी विरोध करतो, हे कोण सांगत नाही. त्यामुळेच आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रकल्प आले पाहिजेत या बाजूने काम करीत आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गमध्ये चष्म्यांचा कारखाना आणण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येथे अनेकांनी रोजगार उपलब्ध होईल. असे प्रकल्प आणले तर मंत्री केसरकर यांचे स्वागतच केले जाईल. तसेच असे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी त्याचा पाठपुरावा करू, असेही साळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
शासनाने पंधरा दिवसात मुख्याधिकारी द्यावा!
सावंतवाडी नगरपालिकेला अनेक दिवस मुख्याधिकारी नाही. मग शहराचा कारभार पुढे कसा न्याचा, असा सवाल नगराध्यक्ष साळगावकर यांनी केला आहे. त्यामुळे शासनाने पंधरा दिवसात सावंतवाडीला मुख्याधिकारी द्यावेत. अन्यथा आम्ही मंत्रालयासमोर उपोषणाला बसू, असा इशारा दिला असून, मुख्याधिकारींबाबत आम्ही पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले असल्याचेही साळगावकर यांनी स्पष्ट केले आहे.