मुंबई : म्हैसाळा (ता.मिरज, जि.सांगली) येथील भ्रूण हत्या प्रकरणात कोल्हापूर, मिरज, सांगलीतील काही प्रथितयश डॉक्टर सामील असल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेचे कामकाज बाजूला ठेऊन या भ्रूण हत्येवर चर्चा घ्यावी, असा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. हा विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसत नाही, असे सांगून अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विखे पाटील आणि काही सदस्यांना बोलण्याची अनुमती दिली. सरकारने या विषयावर निवेदन करावे, असे निर्देशही दिले. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच सरकारची भूमिका असेल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत म्हणाले. सरकारतर्फे सायंकाळपर्यंत सभागृहात निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी केली. ‘आपण स्वत: म्हैसाळाला उद्या भेट देऊन गुरुवारी सभागृहात निवेदन करू, असे डॉ.सावंत यांनी सांगितले. तथापि, आज सरकारकडे कुठली माहिती आहे? ती सांगा, असा आग्रह ज्येष्ठ सदस्य दिलिप वळसे पाटील यांनी धरला. त्यावर डॉ.सावंत यांनी सांगितले की, या प्रकरणात सातारा, सांगली, कोल्हापुरातील प्रथितयश रेडिआॅलॉजिस्ट, गायनाकॉलॉजिस्ट, अॅनॅस्थेसिस्ट सहभागी आहेत. कर्नाटकमध्ये सोनोग्राफी करून गर्भपातासाठी महिलांना म्हैसाळामध्ये आणले जात होते. ज्यांना पूर्वी एक किंवा दोन मुली आहेत आणि पुन्हा गर्भात मुलगीच असलेल्यांचा मुख्यत्वे गर्भपात केला जायचा. अधिक चौकशी केली जात आहे. मुख्य आरोपी डॉ.बाबासाहेब खिद्रापुरेला अटक करण्यात आली आहे, असे डॉ.सावंत यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)तो क्रूरकर्मा अखेर शरणम्हैसाळ येथे बेकायदा गर्भपात केंद्र चालवून भ्रूणहत्या करणारा व चार दिवसांपासून गुंगारा देत फरारी असलेला बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे (४२), हा सोमवारी रात्री उशिरा मिरज ग्रामीण पोलिसांना शरण आला. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने म्हैसाळमध्ये एका शेतात लपविलेले क्ष-किरण यंत्रही पोलिसांनी मंगळवारी जप्त केले. मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीराज्यात घडलेल्या या गंभीर घटनेची जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.
भ्रूृणहत्या प्रकरणामध्ये अनेक प्रथितयश डॉक्टर
By admin | Published: March 08, 2017 12:41 AM