ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. २ - आई-वडिलांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या गोवर्धनवाडी येथील बहिणी परिस्थितीशी दोनहात करीत शिक्षण घेत आहेत. ‘निराधार दोघी बनल्या एकमेकींचा आधार’ या शिर्षकाखाली याबाबतचे वृत्त ‘आॅनलाईन लोकमत’ वर २६ जुलै रोजी प्रसिध्द झाले. त्यानंतर राज्यभरातून अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर निकिता आणि पूजा या बहिणींचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करीत होते. मात्र, नातेवाईकांची परिस्थितीही हालाखीची असल्याने आपण किती दिवस त्यांच्यावर अवलंबून रहायचे, आपले आपण कष्ट करून राहू, असे म्हणत या दोघी बहिणी गोवर्धनवाडी येथे रहायला आल्या. दहावीत असलेली मोठी निकिता आठवड्यातील काही दिवस शाळेत जाते तर उर्वरित दिवशी मजुरी करून छोट्या बहिणीसह आपला शिक्षण आणि घरखर्च भागवत आहे. लहान बहीण पूजा इयत्ता आठवीत आहे. पूजाला कुठेही कामाला न पाठविता निकिताने घरातील कर्त्याची जबाबदारी स्वत: खंबीरपणे पेलली आहे. या जीवनाशी खंबीरपणे लढा देणाऱ्या बहिणींना समाजानेही साथ द्यायला हवी, अशा पध्दतीचे आवाहन ‘लोकमत’ने केले होते. ‘लोकमत’मधील सदर वृत्त वाचल्यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी गोवर्धनवाडी येथे जावून या बहिणींची भेट घेतली तसेच विचारपूस केली. दोघींच्या नावाने बँकेमध्ये एक लाखाची एफडी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबरोबरच केवळ या दोन बहिणींपुरताच हा विषय नाही; तर जिल्ह्यात अठरा वर्षाखालील अशी निराधार अनाथ मुले असल्यास त्यांनाही शासकीय योजनांच्या माध्यमातून मदतीसाठी पाटील यांनी पुढाकार घेतला. अनाथ, निराधार असलेल्या व उत्पन्न निकषात बसते, अशा अठरा वर्षाखालील मुलांना तातडीने पिवळे रेशन कार्ड देण्याचे आदेश आ. पाटील यांनी दिले. याबरोबरच संजय गांधी निराधार योजनेत त्यांची नावे समाविष्ट करून अनुदान सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, ढोकी येथील एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गौस मोमीन तसेच तुळजाभवानी पेट्रोल पंपाचे हणमंत घोडके यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. उस्मानाबाद येथील भाई उध्दवराव पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा रविवारी उस्मानाबाद येथे पार पडली. दोघी बहिणींना मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आ. विक्रम काळे यांनी या सभेत केले. यावर संस्थेच्या ४१० सभासदांकडून ४१ हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामध्ये स्वत: आ. विक्रम काळे ४१ हजार रुपये घालणार असून, अशी ८२ हजार रुपयांची मदत निकिताला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेत रोख पाच हजार रुपयांची प्राथमिक मदतही देण्यात आली. तेरणा प्रशालेकडून दरमहा चार हजारनिकिता तसेच पूजाला मदत करण्यासाठी ढोकी येथील तेरणा प्रशालेचे मुख्याध्यापक वसंत भोरे यांनीही शिक्षकांची बैठक घेतली. शाळेत शिक्षक व कर्मचारी असे मिळून ३७ जण कार्यरत आहेत. या सर्वांनी महिन्याला वर्गणी करून निकिताला दरमहा चार हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शाळेच्या वतीने तिचे बँक खातेही काढण्यात आले असून, जुलै महिन्याची मदत म्हणून चार हजारांची रक्कम तिच्या खात्यावर जमा करण्यात आली.जळगावातूनही मदतीसाठी हातसोमवारी जळगाव येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संजय साळुंके यांनी या दोन्ही मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेण्याची इच्छा बोलून दाखविली. याबरोबरच ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर मानभाव यांनीही दर महिन्याला पाचशे रुपये शिष्यवृत्ती देणार असल्याचे सांगत एक वर्षाचे सहा हजार रुपये निकिताच्या खात्यावर जमाही केले. दोन्ही बहिणींचे लग्न होईपर्यंत ही मदत देणार असल्याचे ते म्हणाले. ढोकी येथीलच कैै. किसन समुद्रे युवा प्रतिष्ठाननेही या बहिणींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. निकिताचे शिक्षण चालू असेपर्यंत प्रतिष्ठानतर्फे दरमहा पाचशे रुपये शिष्यवृत्ती देणार असल्याचे पंचायत समिती सदस्य अमोल समुद्रे यांनी सांगितले. दरम्यान, वंदना भारत गॅस एजन्सीचे ज्योतीबा धाकपाडे हे या बहिणींना स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन देणार आहेत. तर ढोकी येथील संग्राम देशमुख यांनीही या बहिणींना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.