मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून चांगलीच जुगलबंदी सुरू आहे. अनेकदा या प्रश्नावर राज्यातील पक्ष नेतृत्वाला प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. तर शिवसेनेकडून देखील 'सामना'मधून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पद कुणाला यावर चर्चा सुरू असताना भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदावरून सूचक इशारा दिला. सोलापूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा दावा तुम्ही मागे घेतला का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले की, आपापलं काम करत राहायच असतं.
तुम्हाला अनपेक्षीतपणे पद मिळत असतात. अध्यक्षपदी विराजमान होईल याची आपल्याला जाणीवही नव्हती. पाच वर्षांपूर्वी मी भाजप अध्यक्ष होणार म्हणून माझ्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी शपथविधीच्या दिवशी फोन आला आणि, मंत्री व्हायचं सांगण्यात आले. त्यावेळी ठरवल सरकारमध्ये जायचं तर सरकारमध्ये किंवा अध्यक्ष व्हायच तर अध्यक्ष असं पाटील म्हणाले.
दरम्यान मागील पाच वर्षांच्या कालावधीत आपण कधीही मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला नाही. विशेष म्हणजे कधीही मुख्यमंत्र्याविरुद्ध एखादं शिष्टमंडळ दिल्लीला गेले नाही. मागील पाच वर्षांत कॅबिनेटच्या बैठकी खेळीमेळीत झाल्या. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याचा विषयच नाही. माणसाला प्रत्येक गोष्ट अचानक मिळत असते. ती अचानक मिळणारी गोष्ट सर्वोत्तम माणून घ्यायची असते, असंही पाटील म्हणाले. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना आगामी काळात अचानकपणे प्रदेशाध्यक्षपदाप्रमाणेच मुख्यमंत्रीपदही मिळू शकते का, अशा चर्चांना उधाण आले आहे.