राणी बंग : ‘विदर्भ रत्न’,‘नागपूर रत्न’ पुरस्कार प्रदाननागपूर : आदिवासींना अशिक्षित, गरीब, मागास असे समजले जात असले तरी त्यांच्यापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त शिक्षणानेच माणूस मोठा होत नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी येथे केले. आदिवासींसाठी जेवढं केले त्यापेक्षा त्यांनी कितीतरी अधिक मला दिलं,अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.रामकृष्ण पैकुजी समर्थ स्मारक समितीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात डॉ. राणी बंग बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे तर प्रमुख अतिथी म्हणून शेखर आदमने उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. राणी बंग (गडचिरोली), अरुण मोरघडे (नागपूर),रजिया सुलताना (अमरावती) यांना ‘विदर्भ रत्न’ तर डॉ. चंद्रकांत मेहर (नागपूर) यांना ‘नागपूर रत्न’ पुरस्कार डॉ. पंकज चांदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. राणी बंग म्हणाल्या की, माणूस फक्त शिक्षणामुळे शिक्षित होतो हा समज चुकीचा आहे. दैनंदिन जीवनातही तो अनेक गोष्टी शिकतो. आदिवासी गरीब, अशिक्षित, अंधश्रद्धाळू आहेत. पण ते कधी भीक मागत नाही,चोरी करीत नाही. उलट आदिवासींमध्ये मुलगा-मुलगी असा भेद केला जात नाही. हुंडा पद्धती नाही, मुलींना विवाहासाठी मुलगा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. महिलांचे शोषण होत नाही. कोणी चोरी करीत नाही, त्यांच्यात शेजारधर्म प्रामुख्याने पाळला जातो. या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. रजिया सुलताना म्हणाल्या की,समाजात राजकारणापासून तर अर्थकारणापासून सर्वच बाबींवर चर्चा होते. मात्र सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लैगिंक शिक्षणावर कोणीच बोलत नाही. लैंगिक साक्षरता नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासकीय पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार अधिक मोलाचा वाटतो. यावेळी अरुण मोरघडे आणि डॉ.चंद्रकांत मेहर यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्निल समर्थ यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन रश्मी मदनकर यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आदिवासींपासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या
By admin | Published: February 09, 2015 12:58 AM