भ्रष्टाचार ही राजकारणालाच नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. ही संपवायची असेल तर सामूहिक प्रयत्न हवेत. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले लोक बहुमताने निवडून येतात. त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात. जोपर्यंत समाज चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर मत मांडले.
अनेकवेळा लोक आम्हाला विचारतात की, एखाद्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही तुम्ही त्याला तिकीट का देता? त्यांना आम्हाला सांगावे लागते की, ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तोच निवडून येतोय. जो स्वच्छ, टिकाऊ आहे, त्याला उभे केलं तर डिपॉझिट जाते त्याचे. केवळ राजकीय नेते बदलून काहीही होणार नाही. समाजाला बदलावे लागेल आणि केवळ समाजावर जबाबदारी टाकता येणार नाही. नेत्यांचेही परिवर्तन झाले पाहिजे. मोदीजी आल्यानंतर काही प्रमाणात हे सुरू झाले आहे. अशा लोकांसाठी कीटकनाशक तयार होतंय. तेच ही कीड हळूहळू दूर करेल, याचा मला विश्वास आहे, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, ‘तुमच्यामुळे माझ्या बोलण्यात फरक पडला’फडणवीस, तुमच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्यावेळी तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झालात, त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की, तुमचा भाषण करताना स्वर इतका वर नका नेऊ. आता तुम्ही पूर्ण बदललेले आहात, असे नाना म्हणाले. त्यावर लगेच फडणवीस म्हणाले, ‘नाना याचं शंभर टक्के क्रेडिट तुम्हाला जातंय. माझ्या विधानसभेच्या प्रत्येक भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा... किती जोराने बोलतो. जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की, आता माझं पुढचं भाषण ऐका आणि भाषणाला उभं राहायचो. पुन्हा तसाच बोलायचो. नानांचा पुन्हा मला फोन यायचा... आता असं वाटतं की मी पूर्णपणे बदललो आहे. हे क्रेडिट फक्त तुमचं आहे.’
तो अधिकार फक्त अजित पवार यांनाचकुठेही श्वास न घेता बोलण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे, असे नानांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. गाण्यामध्ये लतादीदी व बोलण्यात अजितदादा कुठे श्वास घेतात, हेच कळत नाही. नानाच्या या विधानावर जमलेल्या काही नेत्यांमध्ये अजितदादांची तारीफ झाली का टीका यावरुन जाेरदार चर्चा सुरू झाली.