लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा वाढल्याने, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे सरकारही या शाळांकडे दुर्लक्ष करीत असून, धोरणात्मक निर्णय घेत नाही. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि पालकांना एकत्र आणण्यासाठी गोरेगावच्या अ. भि. गोरेगावकर शाळेत मराठी अभ्यास केंद्रातर्फे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मालाड, बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी, सांताक्रुझ, अंधेरी, विलेपार्ले, खार, वांद्रे, कांदिवली, दहिसर या विभागातील १५ मराठी शाळांतील अडीचशे पालक या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर, मराठी शाळांतील शिक्षक, शाळाचालक व भाषासंवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे कार्यकर्तेही बैठकीत सहभागी झाले होते. या वेळी मराठी शाळांसमोरील विविध प्रश्नांवर उपस्थितांनी आपली मते मांडली.मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी सांगितले की, राज्यात मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे. अशा वेळी मराठी शाळांनी एकत्र येऊन आवाज निर्माण केला पाहिजे. मराठी शाळांचा प्रश्न सोडवण्यासाठी शाळा आणि पालकांनी या लढ्यात सहभागी व्हायला हवे. मराठी शाळांतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केल्यास, मराठी माध्यमाकडे लोकांचा कल वाढू शकतो, असे ते म्हणाले.अ. भि. गोरेगावकर शाळेत केल्या जात असलेल्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती शाळेचे संचालक गिरीश सामंत यांनी दिली, तसेच मराठी शाळांच्या सद्यस्थितीविषयी आपली मते मांडली. मराठी शाळेत शिकूनही इंग्रजीवर प्रभुत्व मिळविता येते. इतकेच नव्हे, तर उत्तम करिअरही घडविता येऊ शकते. सरकारकडून वेळोवेळी काढल्या जाणाºया अधिसूचना, निर्णय, यामुळे मराठी शाळांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.याशिवाय या वेळी पालक, शिक्षक व शाळाचालकांनीहीआपली मते मांडली. इंग्रजीऐवजी मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्याला का घातले, याविषयी निवडक पालकांनी आपली भूमिका मांडली. मातृभाषेतून शिक्षण हे अधिक नैसर्गिक व सहज असल्याने, आपण पाल्याला मराठी माध्यमात घातले, असा सूर त्यातून उमटला. या वेळी सुबोध केंभावी यांनी स्मार्टफोनद्वारे कमीत कमी वेळात गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल, याविषयी माहिती दिली.
मराठी शाळा वाचविण्यासाठी पालक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:43 AM