मुंबई : श्रावण महिन्यात होणारे तीर्थस्थानांचे पर्यटन आणि शिर्डीसाठी जाणारी प्रवासी संख्या लक्षात घेत, मध्य रेल्वेने दादर-साईनगर शिर्डी या नव्या साप्ताहिक विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. ट्रेन क्रमांक २२१४७ दादर-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्स्प्रेस ४ आॅगस्टला दादर येथून रात्री २१.४५ वाजता सुटणार आहे. ही सुपरफास्ट एक्स्प्रेस पहाटे ३.४५ वाजता शिर्डी स्थानकात पोहोचेल. दर शुक्रवारी ही ट्रेन धावणार आहे. ट्रेन क्रमांक २२१४८ साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस ५ आॅगस्टपासून दर शनिवारी सकाळी ९.२० वाजता शिर्डी येथून रवाना होणार असून, दुपारी १५.२० वाजता दादर स्थानकात पोहोचेल.श्रावण महिन्यात सर्वाधिक तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा कल भाविकांचा असतो. त्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या वतीने दादर-शिर्डी विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. या साप्ताहिक विशेष ट्रेनला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड आणि कोपरगाव या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी ६ सामान्य द्वितीय श्रेणी बोगी आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज ब्रेक यान आहे. एक वातानुकूलित आणि एक शयनयान श्रेणीच्या बोगींचा या विशेष एक्स्प्रेसमध्ये समावेश करण्यात आला आहे. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून या एक्स्प्रेसचे आरक्षण करता येणार आहे.
मरेची साईभक्तांना ‘एक्स्प्रेस’ भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:33 AM