लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : मी १० टक्के आरक्षण स्वीकारणार नाही. अटक करून जेलमध्ये टाकले, तरी मी मागे हटणार नाही. मी जेलमध्येही आमरण उपोषण सुरू करील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
जरांगे-पाटील म्हणाले, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मी सत्ताधारी नेत्यांना बोललो. राग मात्र, मराठा नेत्यांना आला. आपल्या नेत्यांना जात हवी की नेता हवा, हे स्पष्ट व्हावे. मराठा समाजाला सांगतो, ओबीसीतून आरक्षणाची आपली मागणी आहे, ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही.
तूर्तास आंदोलन स्थगितपरीक्षांचा कालावधी असल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करून धरणे आंदोलन करणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. अंतरवाली येथील मंडप काढण्यासाठी दडपशाही सुरू आहे. गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करा. नाहीतर परिणाम वाईट होतील, असा इशाराही त्यांनी दिला. दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना ई-मेल करा. मला अटक केली, तर आंदोलन करा, पण शांततेत, असे आवाहनही त्यांनी केले.
जरांगेनी लोकसभेची ऑफर नाकारलीमनोज जरांगे पाटील यांनी राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे स्पष्ट करीत लोकसभेसाठीची ऑफर नाकारली आहे. आरक्षण मिळविणे यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिलेल्या प्रस्तावावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनीही जरांगे यांची ते उपचार घेत असलेल्या खासगी रुग्णालयात भेट घेतली.