ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 31 - मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी शहरातील नगर-औरंगाबाद रोडवरील माळीवाडा बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन केले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा, मरठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता. हातात भगवे झेंडे घेऊन शिवाजी पुतळा चौकात मोठे रिंगण करून रस्ता अडविण्यात आला होता. आंदोलनामुळे शहरातून येणारी वाहतूक बायपास मार्गे वळविण्यात आल्याने यावेळी वाहतूक कोंडी झाली नाही. यावेळी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, राजेश परकाळे, बाळासाहेब पवार, कांता बोठे, निखिल वारे, अजय बारस्कर, गणेश भोसले, कैलास गिरवले, अॅड. अनुराधा येवले, राजेंद्र काळे यांनी मनोगत व्यक्त करत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणावर गांभीर्याने निर्णय घेतला नाही, तर ६ मार्च रोजी मुंबईत तीव्र आंदोलन करण्याचा यावेळी इशारा देण्यात आला. दोन तास झालेले हे आंदोलन शांततेच्या मार्गाने झाले. यावेळी आलेल्या रुग्णवाहिकांना तातडीने वाट करून देत आंदोलकांनी पुन्हा एकदा आपली शिस्त दाखवून दिली. आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या होत्या. शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही़, कायद्याच्या चौकटीत बसेल अशा स्वरूपाचे आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान केडगाव चौफुला येथे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आंदोलन करण्यात आले. नगर शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात झालेले आंदोलन शांततेत पूर्ण झाले. आंदोलन झाल्यानंतर शहरातील सर्व आगारातून बस मार्गस्थ करण्यात आल्या.
अहमदनगरमध्ये मराठ्यांचा चक्काजाम
By admin | Published: January 31, 2017 6:30 PM