पुणे : मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या माध्यमातून शांततेत आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजाने आता काहीशी आक्रमक भूमिका घेतली असून आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात रॅली काढण्यात आली.यावेळी सर्व वयोगटातील स्त्रिया आणि पुरुष सहभागी झालेले दिसून आले.
शहरातील मित्र मंडळ चौकातील मॅरेथॉन भवनामध्ये सकाळी सकल मराठा मोर्च्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर बैठक संपवून रॅली काढण्यात आली.लक्ष्मी रस्ता,टिळक चौकामार्गे ही रॅली डेक्कन येथील संभाजी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.रॅली दरम्यान या मार्गावरील दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यानुसार काही काळ लक्ष्मी रस्ता बंद करण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलनात बळी गेलेले काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यांचे फोटो हातात घेऊन अनेकांनी आपली नाराजी प्रगट केली.