मुंबई : मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत असले तरी आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. यापुढे मराठा समाज हा नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा म्हणून ओळखला जाईल, असे अॅड. शशिकांत पवार यांनी नमूद केले. पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शनिवारी एलफिन्स्टन येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शशिकांत पवार यांचा सत्कार केला. या वेळी पवार यांच्या पत्नी सुलभा पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, डॉ.डी.वाय.पाटील, खासदार रामदास आठवले, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार भाई जगताप, आमदार विनायक मेटे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वरमधील आधार तीर्थ आधाराश्रम या आश्रमशाळेला विशेष बाब म्हणून मान्यता देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी भाषणात नमूद केले.दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पाच लाखांचा धनादेश दुष्काळ निधीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हाती यावेळी सुपुर्द करण्यात आला. शिवाय पवार यांच्या ‘जागृती’ या आत्मचरित्रासह स्मरणिकेचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाच मुलांना उम्मीद ए कोशिश या संस्थेने दत्तक घेतले. (प्रतिनिधी)
मराठा समाज नोकरी देईल - शशिकांत पवार
By admin | Published: November 08, 2015 1:00 AM