ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 09 - बहुसंख्यांक असूनही विखूरलेला समाज अशी ओरड मराठा समाजावर होत असताना. कोपर्डी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी औरंगाबादेत अतिविराट मोर्चा काढून मराठा समाजाने एकजूटीची क्रांती घडवून आणली. ‘आमच्या पोरीची अब्रु इतकी स्वस्त कशी कोपर्डीच्या नराधमांना तात्काळ फाशी’ असा संतप्त भावना प्रत्येक जण व्यक्त करीत होते. सुमारे पावने दोन लाख लोकांच्या आपल्या मनातील खद्खद् या मोर्चातून दिसून आली.
क्रांतीचौकातून सकाळी ११ वाजता मुक मोर्चाला सुरुवात झाली. तिथून पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, सराफा रोड, शहागंजमार्गे मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. विशेष म्हणजे या मोर्चात समाजातील विविध क्षेत्रातील,विविध वयोगटातील महिला,पुरुष तसेच तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली. कॉलेजियन विद्यार्थीनी व महिलांची संख्या वाखाणण्याजोगी होती. विभागीय आयुक्तालया समोर मोर्चा पोहोचला तेव्हा शेवटचे टोक क्रांतीचौकात होते. यावरुन या मोर्चाची व्याप्ती लक्षात येऊ शकते. ‘ना भूतो ना भविष्यती’ असा हा मोर्चा ठरला. मोर्चाने मराठा समाजाचे विराट दर्शन घडले शिवाय शिस्तीचेही दर्शन सर्वांना घडले.