शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

मराठा स्वराज्य भवनाचे स्वप्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:31 AM

सर्वांगीण प्रगतीसाठी मराठा समाजाने एकत्र येऊन--रविवार विशेष -जागर

मराठा समाजातील सामान्य किंवा गरीब कुटुंबाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मराठा समाजाने एकत्र येऊन राजर्षी शाहू महाराज यांच्याच संकल्पनेचा विस्तार करायला हवा आहे. म्हणून मराठा स्वराज्य भवनाची निर्मिती होणे आवश्यक आहे.कोल्हापुरात मराठा समाजासाठी ‘मराठा स्वराज्य भवन’ उभारण्यासाठी अनेक वर्षांपासूनची धडपड चालू आहे. त्यासाठी काही आघाडीवरचे कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत घेत शासनदरबारापासून नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, सुयोग्य जागा काही भेटत नाही आणि मराठा स्वराज्य भवनाचे स्वप्न काही प्रत्यक्षात उतरत नाही. गतवर्षी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत मराठा क्रांती मोर्चे निघाले. त्यासाठी लाखो समाजबांधवांनी योगदान दिले. मराठा शेतकरी समाजाची विविध स्तरांवर झालेल्या कोंडीची ती फुटण्याची वेळ आली आहे, असे वाटत होते. त्यातून ऐतिहासिक चुका, सुधारणा, भविष्यातील वाटचाल, आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा होत राहिली होती. त्या जागृतीतून मराठा स्वराज्य भवनाच्या संकल्पनेस जोर येईल, असे वाटले होते. एक-दोन-चार बैठका झाल्या. दोन-चार जागांची पाहणी झाली. अंतिम निर्णय काही झाला नाही. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या हॉकी स्टेडियमजवळ शासनाची सहा एकर जागा आहे ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे; पण सरकार ठाम नाही.मराठा समाजासह संपूर्ण समाजांचे ते व्यासपीठ तयार होणार आहे. समाजाच्या सार्वत्रिक गरजा भागविण्यासाठी अशा भवनाची गरज फार असते. ते एक शहराचे किंवा गावाचे व्यासपीठ होऊन जाते. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आदी घडामोंडीचे केंद्र बनते. आपल्या आजूबाजूला असंख्य उदाहरणे आहेत. कोल्हापूरचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे की, जाती-धर्मावर आधारित सार्वजनिक संस्था असल्या तरी तेथे जात-धर्माच्या आधारावर व्यवहार होत नाहीत. अन्यथा मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीच्या बैठका झाल्या नसत्या. जातवार असलेल्या एकाही बोर्डिंग (वसतिगृहात) इतर जातींच्या मुलांना प्रवेश दिला जात नाही, असे होत नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी जातवार बोर्डिंग्ज् काढण्यास तत्त्वत: विरोध केला होता; पण त्यांच्या अष्टप्रधानांतील अनेकांनी विरोध दर्शविला. सर्व जाती-धर्मांची मुले एकत्र ठेवण्यास समाजाची मानसिकता तयार करावी लागेल ती आजतरी दिसत नाही, असे म्हटले जात होते. तो शंभर वर्षांपूर्वीचा काळ होता. त्यामुळे सर्र्वच समाजाच्या पुढाकाराने आणि सर्व समाजासाठी मराठा स्वराज्य भवनाची उभारणी करण्याचा मानस असताना त्याला जागा उपलब्ध होऊ नये हे दुर्दैव आहे. मराठा स्वराज्य भवनाच्या निर्मितीसाठी इतर समाजातील अनेकांनी जागा मिळताच मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. चांगल्या उद्देशाने सामाजिक जबाबदारी स्वीकारणाऱ्याला आर्थिक पाठबळ देण्याची लोकांची तयारी असते. कोल्हापुरात तरी ती दानत अधिक आहे. अपंग, मतिमंद, वृद्धाश्रम, अनाथ मुले, आदींसाठी कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांना समाजाच्या मदतीचा हात सतत पुढे असतो. ही दानत दाखविण्याची ऊर्मी राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केली आहे.ती भावना काय होती, याचे एक उदाहरण पाहूया. ज्यातून राजर्षी शाहू महाराज यांना वसतिगृहाची संकल्पना सुचली होती. मलकापूर जहागिरीत असलेल्या सरूड वडगावचा विद्यार्थी पांडुरंग चिमणाजी पाटील याने १८९९ मध्ये कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलमधून उत्तमरीत्या मॅट्रिकची परीक्षा पास झाला होता. शेतकरी मराठा समाजातील एक पोरगा मॅट्रिकची परीक्षा उत्तमरीत्या पास झाल्याचे समजताच राजर्षी शाहू महाराज यांना आनंद झाला. त्यांनी त्यास पन्हाळा मुक्कामी असताना भेटीस बोलावले. पांडुरंग चिमणाजी पाटील याचे कौतुक तरी केलेच; पण त्याच्या तोंडून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. तेव्हा महाराजांना कळलं की, तो कुठेतरी एका सरकारी तालमीत झोपत होता. राहण्याची सोय नव्हती, जेवणाची आबाळ होत होती. त्याची हालअपेष्टा ऐकून शिकणाऱ्या मुलांसाठी वसतिगृहांची गरज असल्याचे त्यांनी ओळखले. त्यातूनच वसतिगृहे उभारण्याची योजना त्यांनी आखली आणि १८ एप्रिल १९०१ रोजी कोल्हापुरात पहिले ‘महाराणी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ सुरूही झाले. पांडुरंग पाटील यांची पुढे रावबहाद्दूर म्हणून नेमणूक झाली. कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयाच्या समोरील चौकास अलीकडेच त्यांचे नाव दिले आहे. प्रत्येक जातीच्या पुढाऱ्यांना बोलावून बोर्डिंग्ज् काढायला सांगितली. इमारती उभारल्या. त्यासाठी पैसा दिला आणि उत्पन्नाची साधने देण्याचीही तरतूद केली.कोल्हापुरात अशा प्रकारे बावीस बोर्डिंग्ज् केवळ वीस वर्षांत सुरू केली. एवढेच नव्हे तर पुणे, नाशिक, अहमदनगर, पंढरपूर, नागपूर, आदी ठिकाणीही वसतिगृहे सुरू करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी भरघोस आर्थिक मदत केली. अशी सार्वजनिक शिक्षण, सामाजिक कार्याची परंपरा असलेल्या कोल्हापुरात मराठा स्वराज्य भवनाची उभारणी होणे आणि ते सर्वांसाठी एक व्यापक व्यासपीठ होणे गरजेचे आहे. ते केवळ मंगल कार्यालय किंवा करमणूक केंद्र असू नये, तर नव्या समाजासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञान संपादनाचे केंद्र ठरायला हवे आहे. मराठा समाजातील एक मोठा वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे. तो सामाजिक दृष्ट्याही सजग झाला आहे. दानशूर आहे, त्याची मदत करण्याची तयारी पण आहे. राज्य शासनाने अशा प्रयत्नांना बळ दिले पाहिजे. शासनाची जमीन देण्यात काही शासनावर आर्थिक बोजा पडणार नाही. शासनाची जमीन दिली म्हणून ती विकसित करण्याची जबाबदारी शासनाची राहात नाही. यापूर्वी अनेक संस्थांना एक रुपया मात्र किमतीने किंवा भाडेतत्त्वावर जमिनी दिल्या आहेत. त्यावर उत्तम संस्था उभारल्या आहेत. सांगलीतील मराठा समाज भवन हे एक सर्व समाजाच्या असंख्य कार्यक्रमाचे प्रमुख केंद्र झाले आहे. चित्रकला स्पर्धेपासून व्याख्यानमाला, प्रदर्शने, मंगल कार्यालयापर्यंत विविध प्रकारचे व्यासपीठ म्हणून त्याचा नावलौकिक झाला आहे. याशिवाय तेथे मराठा समाजातील तरुण-तरुणींचे विवाह केंद्र, विधवा, परितक्त्या महिलांच्या पुनर्विवाहाचे केंद्र उत्तम चालविले आहे. या मराठा समाज भवनासाठी दिवंगत नामवंत वकील दत्ताजीराव माने यांनी अपार कष्ट उपसले आहेत. त्यांच्यानंतर एस. आर. पाटील, तानाजीराव मोरे, उत्तमराव निकम, आदी मंडळींनी खूप मेहनत घेऊन समाज भवन चालविले आहे. मराठा समाजाशिवाय गुजरातमधील कच्छ प्रांतातून आलेल्या मारवाडी समाजबांधवांसाठी कच्छी भवन उभारले आहे. ते सर्वच समाजबांधवांचे विविध कार्यक्रमांचे केंद्र बनले आहे. जैन बांधवांनी सांगलीत विश्रामबागेत नेमिनाथ भवन उभारले आहे. इचलकरंजीत माहेश्वरी समाजाचे मोठे भवन आहे. कऱ्हाडमध्ये चाळीस वर्षे नगराध्यक्षपद भूषविण्याचा विक्रम करणारे दिवंगत नेते पी. डी. पाटील यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणुताई यांच्या स्मरणार्थ भव्य-दिव्य सुंदर भवन उभारले आहे. उत्तम ग्रंथालय उभे केले आहे. तेथेही कऱ्हाडमधील विविध कार्यक्रमांचे व्यापक व्यासपीठ ठरले आहे. प्रत्येक शहरात अशी समाज व्यासपीठे मार्गदर्शक ठरतात.कोल्हापूरला तर मोठा इतिहास लाभला आहे. असंख्य संस्था आहेत. त्या उत्तम चालविल्या जातात. राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या बोर्डिंग्ज्पैकी काही उत्तम चालविली आहेत. त्यात जैन बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, प्रिन्स मराठा बोर्डिंग, आदींचा समावेश आहे. वास्तविक, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारधारा पकडून या सर्व बोर्डिंग्ज्च्या व्यवस्थापन करणाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन फेडरेशन किंवा महासंघ स्थापन करायला हवा. एखाद्या बोर्डिंग्ज्ची प्रगती थांबत असेल तर त्यास मदत करायला हवी. तसेच फेडरेशनच्या माध्यमातून विविध एकत्रित उपक्रम राबविता येतील. यासाठी निधी उभा करता येईल. विचारविनिमय किंवा वेगळ्या कल्पना राबविताना एकमेकांच्या अनुभवात सहभागी होता येईल. राजर्षी शाहू विचार संवर्धनासाठी कार्यक्रम करता येतील. शिवाय या बोर्डिंग्ज्मध्ये राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यासाठी महासंघातर्फे समाजातील दानशूर लोकांना आवाहन करून एक कायमस्वरूपी निधी उभा करता येईल. एकीच्या बळातून असंख्य कल्पना लढविता येतील.याच धर्तीवर विविध समाजांची व्यासपीठे असताना मराठा समाजातील सामान्य किंवा गरीब कुटुंबाला सर्वांगीण प्रगतीसाठी मराठा स्वराज्य भवनसारखी कल्पना राबविण्याची गरज आहे. त्यासाठी असंख्य कल्पना मांडल्या आहेत. ते एक समाजाचे किंवा जातीचे नव्हे, तर नॉलेज देणारे नॉलेज सिटीसारखे नॉलेज भवन करण्याची कल्पनाही मांडली आहे. ही दृष्टी खरेच समाजाला पुढे घेऊन जाणारी आहे. यासाठी मराठा समाजाने एकत्र येऊन आणि राज्य सरकारने त्यांना मदत करून राजर्षी शाहू महाराज यांच्याच संकल्पनेचा विस्तार करायला हवा आहे. म्हणून या भवनाची निर्मिती होणे आवश्यक आहे.

वसंत भोसले