पुणे : मराठा समाजाचा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. वेळोवेळी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने अन्याय झाल्याची भावना मराठा न समाजात असून राज्य सरकार विरुद्ध मोठी नाराजी आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी ( दि १७) पुणे जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालुन राज्य सरकारचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्चा ठरल्याप्रमाणे पुणे जिल्ह्याची मराठा आरक्षण स्थगितीबाबत निर्णय बैठक पुण्यातील कृष्णसुंदर गार्डन आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचे सावट असल्याकारणाने ही बैठक मराठा क्रांती मोर्चाच्या मुख्य ५० समन्वयकांच्या उपस्थितीत होते. तसेच झूम वेब द्वारे अनेक कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते.
राजेंद्र कोंढरे म्हणाले,मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे समाज प्रचंड अस्वस्थता पसरली असून ठिकठिकाणी बैठका सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अध्यादेश न काढता स्थगिती उठविण्यासाठी न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करावा.त्याचप्रमाणे लाखोंच्या संख्येने काढण्यात आलेल्या मोर्चाच्यावेळी मराठा समाजातील तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे देखील तात्काळ मागे घेण्यात या आमच्या मागण्या आहेत. त्याच धर्तीवर जिल्हाधिकाऱ्याांना घेराव घालणार आहे. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली नाही तर लढा अधिक आक्रमक करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाअगोदर पूर्ण करण्यात आलेले विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित करण्यात यावे. तसेच स्थगितीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत राज्य सरकारने तात्काळ नियोजन करावे. सारथी संस्थेबाबत प्रलंबित असणारे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत असेही राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.
मराठा समन्वयकांमध्ये धनंजय जाधव,तुषार काकडे, बाळासाहेब अमराळे, प्रमोद अडसूळ, पूजा झोळे व झूम मीट द्वारे राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर , श्रुतिका पाडाळे यांनी देखील यावेळी आपल्या भूमिका मांडल्या.