ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० : मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेचा निषेध आणि अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भातील मागण्यांसाठी मराठी क्रांती मोर्चातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. या सर्व मोर्च्यांचा शेवट दिवाळीआधी मुंबईत होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईतील मोर्चाचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी दादरच्या शिवाजी मंदीर नाट्यगृहात पार पडलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
गेल्या महिन्याभरापासून राज्यभर मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येत मोर्चे निघत आहेत. मुंबईतील मोर्चा हा सर्व मोर्चांचा परमोच्च बिंदू असेल, असे किशोर शितोळे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील मोर्चाची तारिख यावेळी जाहीर करण्यात आली नसली, तरी महत्त्वाची बाब म्हणजे लवकरच मुंबईतील मोर्चाचे नियोजन करणारी कोअर कमिटी निवडण्यात येईल, असे सांगण्यात आले. या कोअर कमिटीद्वारे मुंबईत वॉर्डनिहाय शाखाप्रमुखांची निवड केली जाईल.
संबंधित शाखाप्रमुख त्या-त्या वॉर्डमध्ये मराठा आरक्षणाबाबत प्रचार व प्रसार करतील. राज्यभरात निघालेल्या सर्व जिल्ह्यांतील मोर्चातील कोअर कमिटींचे पदाधिकारी मुंबईतील मोर्चामध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील मोर्चा हा रेकॉर्डब्रेक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. मराठा क्रांती मोर्चाची कोअर कमिटी जे संदेश सोशल मीडियावर पोस्ट करेल, त्यात कोणतीही छेडछाड न करता ते संदेश शेअर करण्याचे आवाहनही संघटनेने केले आहे. कोअर कमिटी मोर्चाचा नकाशा तयार करून त्याची दिशा ठरवेल.
अवघ्या तीन तासांत मोर्चाची सांगता होणे अपेक्षित असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी मोर्चाच्या नियोजनात तरूण आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सभागृहात उपस्थितांच्या मोबाईल क्रमांकांची नोंद घेण्यात आली असून पुढील बैठकांचे नियोजन त्यांना मेसेजद्वारे करण्यात येणार आहे.
तोपर्यंत मोर्चाचे विसर्जन नाही!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मोर्चाची पूर्वकल्पना देण्यात येणार आहे. शिवाय मोर्चा नियोजित स्थळावर पोहचल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करून त्याठिकाणी पोहचण्याचे आवाहन निवेदनात केले जाईल. जोपर्यंत मुख्यमंत्री मोर्चाच्या व्यासपीठावर येऊन आरक्षणाची घोषणा करत नाहीत, तोपर्यंत मोर्चा विसर्जित करण्यात येणार नाही, असा सूचक इशारा संघटनेने दिला आहे.