मुंबई – मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल? विरोधक आणि सत्ताधारी हे एका माळेचे मणी आहे. सरकार आणि विरोधी पक्षांनी मराठा समाजाचा छळ थांबवावा. महाराष्ट्रात आता जे काही वातावरण आहे ते राज्यासाठी पोषक नाही. मराठा समाजाचा अंत पाहू नका अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाने राजकारण्यांना इशारा दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाने सर्वच राजकीय नेत्यांना लक्ष्य केले.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी म्हटलं की, मनोज जरांगे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करतायेत, मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण ओबीसीतून द्यावे अशी त्यांची मागणी आहे. आज त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटलांना माझा सॅल्यूट आहे. कारण आज स्वत: उपाशी राहून समाजाच्या न्यायहक्कासाठी ते लढतायेत. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या यावर मराठा समाजात अंतर्गत मतभेद असतील पण मनभेद नाहीत. सरकार आणि विरोधकांनी मराठा समाजात फूट पाडण्याचा अजिबात प्रयत्न करू नये असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आम्हाला मराठा म्हणून ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी स्पष्ट आहे. परंतु जे सरकारसमोर पर्याय आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल केलीय त्याचा खुलासा करावा. यात टास्कफोर्स तयार करून तात्काळ जलदगतीने आरक्षण द्यावे हा एकमेव मार्ग आहे. सरकार मराठा समाजातील आत्महत्या वाढाव्यात असं सरकारला वाटते. सरकारने येत्या २ दिवसांत निर्णय नाही घेतला तर मुंबईत लाँगमार्च काढू हे सरकारला परवडणारे नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा, गेल्या १५ दिवसांत ८ जणांनी आत्महत्या केली. एकूण ५३ बांधव मराठा समाजाने गमावले आहेत. आणखी किती बांधव गमवायचे? आम्हाला आमचे आरक्षण पुढच्या पिढीसाठी आणि भविष्यासाठी आहोत. आम्ही सामाजिक, आर्थिक मागासलेले आहोत. क्युरेटिव्ह पिटिशनवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अन्यथा आम्हाला सरसकट ५० टक्क्यांतील आतमध्ये ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी मराठा समाजाने केली.