सांगली - महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी सांगलीतून मराठा क्रांती मोर्चाचे चाळीस जणांचे एक पथक मंगळवारी २१ आॅगस्ट रोजी केरळला रवाना होत आहे. आरोग्यापासून दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा केरळवासीयांना पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती मोर्चाचे डॉ. संजय पाटील आणि धनंजय वाघ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, माणुसकीचे नाते जपण्याचा हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घेतला. या निर्णयाचे स्वागत करताना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी, याकामी मराठा क्रांती मोर्चास शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. केरळमधील एर्नाकुलम येथील १२ किलोमीटरच्या परिसरात सांगलीतील ही टीम काम करेल. या पथकात ६ डॉक्टर, पाच वैद्यकीय सहायक आणि अन्य स्वयंसेवक असणार आहेत. मंगळवारी दुपारी हे पथक आवश्यक सामग्रीसह त्याठिकाणी दाखल होईल. दरम्यान, केरळमध्ये आणखी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, याची माहिती या पथकातील स्वयंसेवक सांगलीत असलेल्या दुसºया पथकास देणार आहेत. त्यानंतर पुन्हा दुसरे पथक त्यांच्या मदतीसाठी जाईल. सध्या केरळमध्ये असलेले सांगलीतील गलाई बांधव आम्हाला आवश्यक सामग्रीची माहिती देत आहेत. त्यानुसार साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. मेडिकल असोसिएशनच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून घेतला आहे. लोकांचाही यात सहभाग व्हावा, म्हणून सोमवारी क्रांती मोर्चाने रॅली काढली. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीस सुरुवात झाली. एक मदतपेटी हाती घेऊन रॅलीतून लोकांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले. या रॅलीस सांगलीकरांनी प्रतिसाद दिला. मारुती रोड, कापडपेठ, टिळक चौक, गणपती मंदिर, टिळक चौक, राजवाडा चौकमार्गे ही रॅली स्टेशन चौकात आली. याठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली. संकलित झालेली मदत व अन्य साहित्य घेऊन आता स्वयंसेवकांचे पथक मंगळवारी केरळकडे रवाना होत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत भोसले, विजय खेतरे, रोहित शिंदे, अंकित पाटील आदी उपस्थित होते. सोलापूरहून चादरी, टॉवेलसोलापूर मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगलीतील या उपक्रमास सहकार्य म्हणून सोलापुरी चादरी आणि टॉवेल देण्यात आले आहेत. अन्य जिल्ह्यांतूनही मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मदत करू इच्छिणाºया सर्व लोकांनी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात वस्तू व आर्थिक मदत जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मराठा क्रांती मोर्चाचा केरळवासीयांना मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 8:17 PM