ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 16 - मराठा समाजातील विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आला अशी माहिती , मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी पत्रकार परिषदेत येथेदिली. या मोर्चाची राज्यभर जय्यत तयारी सुरू असून १८ जून रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. समन्वयक म्हणाले की, कोपर्डीतील घटनेला १३ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. असे असताना त्या पीडितेला अद्याप न्याय मिळालेला नाही, जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषींना सहा महिन्यात फासावर लटकविण्यात येईल, ही शासनाची घोषणाही फुसकी ठरली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात,यासह विविध मागण्यासाठी पहिला मराठा क्रांती मोर्चा ९ आॅगस्ट २०१६ रोजी औरंगाबादेत काढण्यात आला. या मोर्चानंतर राज्यात आणि देशातील अन्य राज्यातही मराठा क्रांती मोर्चे निघाले. जानेवारी महिन्यात मुुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मराठा क्रांती मोर्चात सत्ताधाऱ्यांनी फुट पाडली आणि मुंबईचा मोर्चा स्थगित करावा लागला. आता मात्र फुट पाडणाऱ्यांना बाजुला ठेवून पुन्हा मराठा क्र ांती मोर्चाचे राज्य समन्वयक एकत्र आले. २२ ते २४ मे दरम्यान मुंबईत बैठका झाल्या. या बैठकीत ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा काढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तसेच मराठा समाजातील मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची शपथ शिवराज्यभिषक दिन रायगडावर घेण्यात आली. शिवाय आज शुक्रवारी येथे जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुंबईतील स्थानिक पदाधिकाऱ्यांंनी या मोर्चाच्या तयारीत स्वत:ला झोकून दिले आहे. या महामोर्चाला महाराष्ट्र आणि सीमा भागातील मराठा बांधव आणि मराठाबहुल सात राज्यातील लोक सहभागी होणार आहे. या मोर्चासाठी मुंबईला जाणाऱ्यांच्या वाहनांची पार्किग करण्यासाठी सात मोठी मैदाने निवडण्यात आली. या पत्रकार परिषदेला रवी काळे, अप्पासाहेब कुढेकर,सुनील कोटकर, प्रा.माणिक शिंदे,रमेश केरे,रेखा वाकडे, किरण काळे, सुचिता जोगदंड, मनोोज गायके,सतिश वेताळ, ज्ञानेश्वर गायकवाड,निलेश ढवळे, पंकज चव्हाण, शैलेश भिसे, प्रशांत इंगळे, राहुल बनसोड, काकडे पाटील आदी उपस्थित होते. बँक खाते उघडणारमुंबईतील महामोर्चासाठी लागणाऱ्या खर्चासाठी समाजबांधवाकडून मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येत असल्याचे समन्वयकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवाय सर्व व्यवहार धनादेशानेच केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
९ आॅगस्ट रोजी मुंबईत धडकणार मराठा क्रांती मोर्चा
By admin | Published: June 16, 2017 8:05 PM