मुंबई, दि. 9 - मुंबापुरीमध्ये मराठा समाजाचा भगवं वादळ धडकले आहे. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक अशा मूकमोर्चाला सुरुवात असून आंदोलक आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी काटेकोर पद्धतीनं नियोजन करण्यात आले आहे. वाशी टोल नाका परिसरात वाहतूक सुरळीत आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी टोलमुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरील वसुली मंगळवारपासून बंद आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. नाशिक-मुंबई हायवेवरील पडघा, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आणि जुन्या हावेवरील सर्व टोलनाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोलनाका, वाशी आणि ऐरोली टोलनाका, अशी सगळीकडे टोलवसुली बंद आहे.
सकाळी 8 वाजेपर्यंत मोठी 3000 वाहनं तर लहान 200 वाहनं मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील सर्व पार्किंग ग्राऊंड जवळपास फुल्ल झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्क करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय पालिकेतर्फ रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
पश्चिम उपनगरातील मराठा आंदोलकांची ''लोकल''ला पसंतीपश्चिम उपनगरातील मराठा आंदोलकांनी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी लोकलनेच प्रवास करण्यास पसंती दिली. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे, त्यातच चाकरमान्यांची गर्दी यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून वेळेत नियोजित स्थळी पोहोचणे अशक्य होते. म्हणून पहाटे निघून लोकलनेच पोहोचण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती कार्यकर्ता चंद्रकांत पारते यांनी दिली.
नवी मुंबई रेल्वे परिसर