मुंबई : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाला चार दिवसांनंतर पोलिसांनी तोंडी परवानगी दिली असली, तरी अद्याप राज्य सरकारकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी व्यक्त केली आहे.डोंगरे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि शासकीय नोकरी देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र आत्महत्यांना चार महिने उलटल्यानंतरही संबंधित कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळालेली नाही. याउलट मदतीसाठी आंदोलन करणाऱ्या कुटुंबीयांना परवानगी नाकारण्यात येत होती. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. याशिवाय गेल्या चार दिवसांपासून सरकारने मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केल्याने मराठा समाजातील रोष वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याआधी सरकारने सर्व मागण्या मान्य करण्याचे आवाहन डोंगरे यांनी केले.समन्वयक नानासाहेब जावळे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची गरज आहे. अन्यथा आरक्षण टिकणार नाही. सरकारकडून दोन समाजांत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तूर्तास मराठा क्रांती ठोक मोर्चाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लवकरच ठोक मोर्चा आपल्या पद्धतीने आंदोलनास सुरुवात करेल. त्यानंतर सर्व जबाबदारी सरकारची असेल.
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनास अखेर परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 3:07 AM