लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, परीक्षा अशा अनेक कारणांनी लांबणीवर पडलेल्या मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची तारीख अखेर ठरली आहे. येत्या ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनाचे निमित्त साधत मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने बुधवारी सम्राट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.समन्वयक रवींद्र काळे-पाटील म्हणाले की, ९ आॅगस्ट रोजीच राज्यातील मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली होती. त्यामुळे राजधानीत महामोर्चा काढण्यासाठी हाच दिवस निवडण्यात आला आहे. सर्व आचारसंहितांचे पालन करून निघणाऱ्या या मोर्चात देशातील मराठा समाजाला आणण्याचे नियोजन केले जाईल. या नियोजन अभियानाची घोषणा ६ जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे निमित्त साधत केली जाईल. व्यापक अभियानातून खेड्यापाड्यामधील मराठा तरुणापर्यंत पोहोचले जाईल. १३ जुलैला कोपर्डी येथील क्रांतिज्योतीला श्रद्धांजली वाहून अभियानाचा आढावा घेतला जाईल. एक वर्ष पूर्ण होत असतानाही कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळाला नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.राणीबाग मैदान ते आझाद मैदानपर्यंत धडक देणारा हा महामोर्चा खऱ्या अर्थाने देशव्यापी महामोर्चा ठरेल, असा दावाही समन्वयकांनी केला आहे. आतापर्यंत सरकारसोबत चर्चेसाठी एक चेहरा नसल्याने मराठा समाजाच्या प्रश्नांची सरकारने गंभीरतेने दखल घेतली नाही, असा आरोप समन्वयक राजेंद्र कोंडरे यांनी केला. ते म्हणाले की, मराठा विद्यार्थ्यांना शुल्कमाफी व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रमुख मागणी येत्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आवाहन सरकारला केले आहे. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर २० महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये शिक्षण, शेती आणि इतर क्षेत्रांतील जाणकारांसह मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे..................................इतर समाजांनी विरोध करू नये!मराठा समाजाला कोणत्याही जातीचे आरक्षण नको आहे. शिवाय अॅट्रोसिटी कायदा रद्द करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी नाही. तर अॅट्रोसिटी कायदा कडक करताना त्याचा गैरवापर होणार नाही, अशी तरतूद करण्याचा संघटनेचा आग्रह आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाने मराठा क्रांती मोर्चा विरोधात मोर्चा काढण्याची गरज नसल्याचे मत नाना कुटे-पाटील यांनी व्यक्त केले.शेतकरी संपाला पाठिंबा१ जूनपासून संपावर जाणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा घोषित केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रामाणिक आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चा पाठिंबा देईल, असेही समन्वय समितीने स्पष्ट केले.
मुंबईत ९ आॅगस्टला मराठा महामोर्चा
By admin | Published: May 25, 2017 2:31 AM