मुंबई, दि. 9 - आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी आणि अन्य मागण्यांसाठी मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघालेला असताना विधिमंडळात या मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. मोर्चाला सुरुवात होताच भाजपाचे आमदार मंत्रालयाजवळच्या आयनॉक्स थिएटरपासून घोषणाबाजी करत सभागृहात दाखल झाले. विधानभवनाच्या पाय-यांवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमने-सामने आले त्यावेळीही घोषणाबाजी झाली.
विधिमंडळात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. यावेळी राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. सभापतींसमोरच्या मोकळया जागेत सर्वपक्षीय आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण जाहीर करावं ही मागणी करत विरोधकांनी विधानपरिषदेत गदारोळ केला त्यामुळे सदनाचं कामकाज सभापती रामराजे निंबाळकर यांनी 30 मिनिटांसाठी तहकूब केलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत हे सरकार आल्यापासून या विषयावर अनेकदा चर्चा झाली मात्र आरक्षण मिळालं नाही त्यामुळे चर्चा नको आरक्षण द्या अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली.मोर्चात सहभागी व्हायचं असल्यामुळे आजचं कामकाज स्थगित करा अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी लावून धरत विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केला. त्यामुळे कामकाज अर्धा तास स्थगित करण्यात आलं.
दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा सरकारवर टीका केली. शिवसेना-भाजपाला मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. चर्चा रोखण्याची त्यांची भूमिका आहे असा आरोप त्यांनी केला. हवामानाप्रमाणे शिवसेनेची धोरणे बदलत असतात असे त्यांनी सांगितले. भाजपाची भूमिका शेतकरी आणि आरक्षण विरोधी आहे. गेल्या अडीचवर्षात आपण हे पाहिले आहे अशी टीका त्यांनी केली.