- संतोष तोडकर/ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि.04 - मराठा क्रांती मूकमोर्चाची लोकप्रियता व त्यामध्ये सहभागी होणा-या तरुणांची संख्या लक्षणीय आहे. याची प्रचिती राज्यातील विविध जिल्ह्यांतून निघत असलेल्या मोर्चामधून येत आहे. लाखोंच्या संख्येने निघणारे हे मोर्चे कुणाच्या एका छताखाली नसल्याने नियोजनात एका व्यक्तीला अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मर्यादा येत आहेत. त्यातूनच तरुणाईचे हक्काचे व्यासपीठ असणा-या सोशल मीडियाचा आधार प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी घेतला जात आहे. त्यातूनच ‘मराठा क्रांती मूक मोर्चा-कोल्हापूर’ या अॅपची निर्मिती करण्यात आली असून आता सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
याद्वारे महाराष्ट्रात आजवर झालेल्या सर्व मोर्चातील क्षणचित्रे व व्हिडिओज उपलब्ध करून देण्यात आली आहेत तसेच जिल्ह्यात मोर्चासंबंधी होत असलेल्या सभा, बैठका, नियोजन, स्टीकर्स, टी शर्टस याबद्दल माहिती मिळणार असून कार्यकर्तेही मोर्चासंदर्भातील फोटो व व्हिडीओज या माध्यमातून अपलोड करू शकणार आहेत. मोर्चाच्या दिवशी शहरातील विविध चौकांत सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून त्याचे थेट प्रक्षेपण या अॅपद्वारे जगभर पोहोचविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचता यावे या हेतूने www.marathakrantimorchakop.com ही वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे. याद्वारे जिल्ह्यातील स्वयंसेवकांची नोंद करण्यात येत आहे तसेच तालुका स्तरावर स्टीकर्स, बॅनर्स उपलब्ध व्हावेत यासाठी त्याचे डिझाईन्स या वेबसाईटवर पाहावयास मिळणार आहेत. या वेबसाईटची निर्मिती शिरीष जाधव यांनी केली आहे.
कोल्हापूर सर्व सामाजिक चळवळींचे केंद्रबिंदू मानला जातो म्हणून येथून निघणा-या मोर्चाबाबत जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या मोर्चाची माहिती नियोजनाची महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोप-यांत पोहोचविण्यासाठी मोर्चासंदर्भात प्रत्येक मिनिटाच्या अपडेटस्साठी दसरा चौक येथे वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राहावी तसेच या निमित्ताने कोणी अफवा वा चुकीचे संदेश पसरवू नये यासाठी मोर्चाच्या निमित्ताने तयार केलेल्या विविध व्हॉटस् अॅप ग्रुप्स व फेसबुक पेजवरील अपडेटस्वर वॉर रूमच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे तसेच मोर्चासंबंधी अपडेटस् व माहितीपूर्ण लेख वॉर रूममधून फिल्टर करून फॉरवर्ड करणे, स्वयंसेवकांना व कार्यकर्त्यांना बल्क मेसेज करणे ही कामे येथून केली जाणार आहेत. त्यासाठी मनोज नरके, प्रतीक जगताप, शिवराज जाधव, सिद्धी घाडगे, अक्षय शिंदे, भास्कर सबनीस, प्रशांत बर्गे, सचिन पाटील, संग्राम शिंदे या तरुण शिलेदारांची टीम परिश्रम घेत आहे.
अॅप कसे वापराल ?
गुगल प्ले स्टोअरवर गेल्यास ‘EXYnow’ हे अॅप दिसेल. ते डाऊनलोड केल्यानंतर त्यावर आपला ई-मेल आयडी भरावा लागेल. त्यानंतर ‘मराठा क्रांती मोर्चा-कोल्हापूर’ हा आयकॉन दिसेल. रजिस्टर करण्यासाठी त्यावर आपले नाव व मोबाईल नंबर भरावा लागेल. त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर संदेश स्वरुपात आलेला ‘ओटीपी’ क्रमांक भरल्यास अॅपच्या होम पेज दिसेल. या अॅपची निर्मिती विनायक भोगम यांनी केली आहे.