मुंबई, दि12- एक मराठा, लाख मराठा अशी घोषणा असलेला मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला मोर्चा आझाद मैदान आणि परिसरामध्ये विसर्जित करण्यात आला. लाखो मराठे ज्या भागामध्ये मोर्चा घेऊन आले तो परिसर ब्रिटीश काळामध्ये एस्प्लनेड म्हणून ओळखला जात असे. मराठ्यांना आपल्या किल्ल्यापासून दूर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोकळ्या जागेवर आणि खंदकाजवळच योगायोगाने हा मोर्चा येऊन थांबला. मराठ्यांपांसून बचाव करण्यासाठी खोदलेला हा खंदक 'मराठा डीच' नावाने ओळखला जाई. 1739 साली बांधलेल्या या खंदकापर्यंत पोहोचायला मराठ्यांना 278 वर्षे लागली. त्या काळात किल्ल्यामध्ये युरोपियन लोक बहुसंख्येने राहात असत त्यामुळे त्याला व्हाईट टाऊन म्हटले जाई तर बाकी लोकांना किल्ल्याबाहेरील असणाऱ्या गावास नेटिव्ह टाऊन म्हणत. किल्ल्यात राहणाऱ्या लोकांमध्येही दोन-तृतियांश लोक पारशीच होते.
(नकाशासाठी सौजन्य- विकिपिडिया)
ब्रिटिशांनी मुंबईमध्ये वसाहत केल्यानंतर आज फोर्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरामध्ये आपला किल्ला बांधला. या किल्ल्याच्या आतच त्यांचे सर्व व्यवहार होत असत. आजच्या जीपीओ समोरील वालचंद हिराचंद मार्गाच्या पुर्वेपासून सुरु होणारा हा किल्ला लायन्स गेटपर्यंत पसरलेला होता. तसेच पुढे आज असणारा कुलाबा वगैरे परिसर तयार करण्यासाठी रिक्लमेशन तेव्हा झालेले नव्हते. मुंबई किल्ल्याचे आणि वसाहती रक्षण करण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या भोवती भिंतही बांधली. तसेच या भिंतीवर प्रत्येक कोपऱ्यावर फ्लॉवर ट्री, रॉयल, किंग्ज, चर्च, मूर फ्लॅग स्टाफ, बनियान असे बॅस्टन म्हणजे बुरुज बांधले. कालांतराने त्यांनी जवळचा डोंगरीचा किल्ला असणारी टेकडी पाडून तेथे सेंट जॉर्ज नावाचा किल्ला बांधला व तो मूळ किल्ल्याचा जोड किल्ला म्हणून वापरला जाऊ लागला. आज तेथे सेंट जॉर्ज रुग्णालय आहे.
1739 साली मराठ्यांनी वसईवर विजय मिळवला आणि पोर्तुगिजांच्या वसाहतीमधील महत्त्वाचा किल्ला ताब्यात घेतला. वसई आणि परिसराचा पाडाव झाल्यावर मराठे मुंबईकडे सरकतील या भितीने इंग्रजांनी आपल्या किल्ल्याचे संरक्षण वाढवण्याची तयारी सुरु केली. त्यांनी किल्ल्याच्या भोवती खंदक खोदायला सुरुवात केली. या खंदकाच्या कामासाठी शहरातील धनाढ्यांनी आर्थिक मदत केली होती. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये केलेले मुंबईतले ते पहिले काम असावे. त्यानंतर किल्ल्यापासून थोडी लांब अशी मोकळी जागा ठेवण्यात आली. ज्याला एस्प्लनेड म्हटलं जातं. मराठे चाल करुन आलेच तर त्यांना थांबवण्यासाठी, मारण्यासाठी या जागेचा वापर करता येईल, ते बंदुकीच्या गोळीच्या टप्प्यात येतील असा विचार करण्यात आला होता. आता या मोकळ्या जागेत आझाद मैदान, महात्मा गांधी रस्ता आणि आसपासचा परिसर आहे. 9 ऑगस्टला आलेला मराठा मोर्चा येथे येऊन थांबला.
आजही नेटिव्ह टाऊनचे (पक्षीः महाराष्ट्राचे) निर्णय व्हाईट टाऊनच्या सीमेपुढेच होतात. व्हाईट टाऊनच्याच सीमेवर सगळे मोर्चे येऊन थांबतात. संरक्षक भिंती गेल्या, खंदक गेला, ब्रिटिश गेले तरी हे कायम आहे. काळ बदलला, संदर्भ बदलला तरी इतिहास कोठेतरी डोकावतोच. आता किल्ल्याच्या पुढे असणाऱ्या मंत्रालय आणि विधिमंडळापर्यंत मराठा आरक्षणाची हाक गेली का हे पुढे पाहायचे.
कोलकात्याप्रमाणे मुंबईतही मराठा डीच1739 साली पोर्तुगिजांकडून वसई किल्ला घेतल्यानंतर मराठे वांद्रे आणि कुर्ला पर्यंत आले. ते आणखी पुढे आले तर बचावासाठी किल्ल्याभोवती भिंती बांधण्यात आल्या. या दोन भिंतीच्यामध्ये खंदक खोदला गेला. आजच्या महात्मा गांधी रस्ता आणि दादाभाई नौरोजी रस्त्याच्यामध्ये हा खंदक होता. कोलकात्यातही नागपूरच्या भोसल्यांच्या माऱ्यापासून बचाव करण्यासाठी असा खंदक खोदण्यात आला होता. त्यालाही मराठा डिच नाव होते. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात अमेरिकेतील कापूस कापड गिरण्यांना मिळेनासा झाला. तेव्हा भारतातील कापसाला परदेशात मागणी वाढली. तेव्हा मुंबईत कापसाचा मोठ्या प्रमाणात पैसा आल्यावर 1860 च्या सुमारास फोर्टची भिंत पाडून नव्या इमारती बांधल्या गेल्या. खंदकामध्ये साठलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास होत असे, त्यामुळे रोगराई वाढून शहरातील लोक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले, त्यामुळेच कालातंराने खंदक बुजवण्यात आला.भरत गोठोसकर, नागरी इतिहासाचे अभ्यासक