मुंबई, दि. 01 - मुंबईत 9 ऑगस्ट रोजी काढण्यात येणा-या मराठा मोर्चा आधी शिष्ठमंडळाने राज्य सरकारसोबत सविस्तर चर्चा करावी, त्यासाठी राज्य सरकार शिष्ठमंडळाला चर्चेचे निमंत्रण देईल, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी म्हटले आहे. मुंबईतीत 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी मुंबईत मराठा महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा तरुणांसाठी सरकारनं अनेक निर्णय घेतले. तर दुसरीकडे आरक्षण आणि अॅट्रॉसिटीचा मुद्दा अजून न्यायप्रविष्ठ आहे. सरकार यासाठी चर्चेतून तोडगा काढण्यास तयार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, परीक्षा अशा अनेक कारणांनी लांबणीवर पडलेल्या मुंबईतील मराठा समाजाच्या मोर्चाची तारीख अखेर ठरली. रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत हा एकमताने निर्णय घेण्यात आला होता. राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत खासदार संभाजीराजे भोसले, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सर्वसामान्य लोक उपस्थित होते.मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन या बैठकीत मराठा नेत्यांनी दिले आहे. तर, या मोर्चात संभाजीराजे छत्रपतीही सहभागी होणार आहेत. कोपर्डी घटनेनंतर महाराष्ट्रात एकूण 58 मराठा मोर्चे निघाले. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभरात शांततेच्या मार्गाने मूकमोर्चा काढण्यात आला. आता राज्याची राजधानी मुंबईतही मराठा मोर्चाचे वादळ धडकणार आहे.