मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर २० मागण्यांसाठी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चावरून समन्वयकांमध्येच समन्वय नसल्याचे समोर आले आहे. काही जिल्ह्यांतील समन्वयकांनी ३१ जानेवारी या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे; तर काही प्रतिनिधींकडून कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणार असल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.याआधी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या औरंगाबाद येथील समन्वयकांनी ३१ जानेवारीला मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली. पण बैठकीत नियोजनाऐवजी ३१ जानेवारीच्या तारखेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. मुंबईसह रायगड, नवी मुंबई, पालघर आणि ठाण्यातील काही समन्वयकांनी या तारखेसंदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. शिवाय १५ जानेवारीला बैठक घेऊन त्यातच अंतिम निर्णय घेण्याचे मान्य केले. औरंगाबादचे समन्वयक रवींद्र काळे पाटील यांनी ३१ जानेवारीला कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. त्यापाठोपाठ मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही मोर्चा निघणारच असा एल्गार केला आहे. (प्रतिनिधी)बैठकीतील निर्णय मान्य!३१ जानेवारीला मोर्चा काढण्यास विरोध नाही. मात्र मुंबईसह राज्यातील २६ जिल्ह्यांत असलेल्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा सारासार विचार व्हायला हवा. त्यामुळे १५ जानेवारीला होणाऱ्या राज्यातील सर्व जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीतील निर्णय मान्य केला जाईल. तोपर्यंत समाजाने कोणत्याही घोषणेवर विश्वास ठेवू नये.- वीरेंद्र पवार (समन्वयक, मराठा क्रांती मूक बाइक रॅली - मुंबई)सुपारी घेतल्यासारखे वागू नये!मुंबईतील महामोर्चा हे मराठा समाजाचे ब्रह्मास्त्र आहे. आचारसंहितेमध्ये सरकारचे हात बांधलेले असताना कुणाच्या तरी अट्टाहासासाठी ते वाया घालविण्यात काहीही अर्थ नाही. मुळात निवडणुकांच्या काळात राजकीय उमेदवारांना मोर्चात सामील होता येणार नाही.त्यामुळे केवळ सुपारी घेतल्यासारखे कोणत्याही समन्वयकाने वागू नये. - विनोद पोखरकर (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - नवी मुंबई)अपयशी झाल्यास काय करणार?आचारसंहितांमूळे निवडणुकांच्या कामात मराठा समाजाचे उमेदवार अडकून मोर्चा अपयशी झाल्यास काय करणार? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे सर्व जिल्हा प्रतिनिधींनी मिळून १५ जानेवारीच्या बैठकीत योग्य तो निर्णय घ्यावा.- विनोद साबळे (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - रायगड)समन्वयात नाही, तर तारखेवरून गोंधळ!मोर्चा निघू नये, म्हणून सरकारचा कोणताही दबाव नाही. केवळ ३१ जानेवारीलाच मोर्चा काढायचा की पुढे ढकलायचा याबाबत गोंधळ आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत तो स्पष्ट होईल.- वैभव जाधव (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - पालघर)
मुंबईत मराठा मूक मोर्चा : निर्णय १५ जानेवारीला
By admin | Published: January 10, 2017 5:03 AM