जालना - मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही जरांगेंची मागणी आहे. त्यासाठी गेल्या ५ दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरू आहे. शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी बीड, धाराशिव जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. उपोषणाच्या ५ व्या दिवशी जरांगेंची तब्येत बिघडली होती. त्यानंतर रात्री उशिरा वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेल्या ओबीसी कार्यकर्ते आणि अंतरवाली सराटीतील मराठा कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली. जालनातील वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे उपोषण सुरू आहे त्याठिकाणापासून ३ किमी अंतरावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. अंतरवालीकडे जाणाऱ्या मार्गावरच ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू असल्याने इथं मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात.
सलाईनद्वारे रात्री पावणे दोन वाजता उपचार
५ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत शुक्रवारी ढासळली, जरांगेंमध्ये उभे राहण्याची ताकदही नव्हती. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज होती. मंत्री शंभुराज देसाई यांच्याशी फोनवरून झालेल्या संवादानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सलाईनद्वारे उपचार घेतले आहेत. शंभुराज देसाई यांनी जरांगेंना आज सलाईन घ्या, फक्त २ दिवस थांबा अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान राखून उपचार घेतोय असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
...तर चंद्र सूर्य असेपर्यंत भाजपाला वर येऊ देणार नाही
आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. राजकारणाचं बोलत नाही, उमेदवार उभं करायचा म्हणत नाही. उमेदवार पाडायचं बोलत नाही. आपली चळवळ राजकीय करायची नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात यायचे नाही. आता संधी दिली. आरक्षण देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे. तुम्ही आरक्षण दिले नाही तर भाजपामधला मराठाही तुमच्या बाजूने राहणार नाही. मी मराठ्यांच्या लेकरासाठी मरायला तयार आहे. मी उपचार घेणार नाही, तुम्हीही मला उपचार घ्यायला लावू नका. जर मला काही झाले तर माझा एकच शब्द लक्षात ठेवायचा कधी चंद्र, सूर्य असेपर्यंत भाजपाला वर येऊ द्यायचा नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होते.