हिंगोली - एकच पर्व, ओबीसी सर्व...आपापसातील मतभेद बाजूला ठेवा. भुजबळांना बोलवा नाहीतर नका बोलवू, ओबीसींचा आवाज बुलंद करा. मी देशात अनेक ठिकाणी सभेचं नेतृत्व केले. आमदारकी, मंत्रिपदाची हौस नाही. गरीब मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या पण आमच्यावर बुलडोझर चालवू नका असं विधान मंत्री छगन भुजबळांनी केले आहे.
मंत्री छगन भुजबळांनी हिंगोलीच्या सभेत विविध मागण्या केल्या. जे मराठा समाजाच्या सारथीला मिळाले ते ओबीसी, महाज्योतीलाही हवं, मराठा समाज मागास नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितले मग शिंदे समिती ताबडतोब बरखास्त करा, गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या, निरगुडे आयोग, ओबीसी आयोग यांना काहीही आदेश असले तरी मराठा समाजाचे मागासलेलेपण सिद्ध करा. सर्वांचे सर्वेक्षण करा. एका समाजाचे सर्वेक्षण कसे होणार, कुठला समाज मागे आहे, कुठला समाज पुढे आहे याची तुलना झाली पाहिजे. सर्व जातीचे सर्वेक्षण करून कोण मागासलेले आहे आणि कोण पुढारलेले आहे.बिहारनं जनगणना केली ६३ टक्के आढळले, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, शरद पवार, अजित पवार, राहुल गांधी सगळेच सांगतायेत जनगणना करा. होऊ द्या जनगणना, मग कोणाची किती ताकद, लोकसंख्या किती हे कळेल. बिहार करू शकते तर महाराष्ट्र का करू शकत नाही. जे होईल ते मान्य करायला आम्ही तयार आहोत असं भुजबळांनी म्हटलं.
तसेच आमचा मराठा समाजाला विरोध नाही. त्यांना आरक्षण द्या पण वेगळे द्या. २ वेळा कायदा आला आम्ही समर्थन दिले. मराठा समाजाला विरोध नाही तर जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे. उपोषणकर्त्यासोबत राहणारा बेद्रेसह ३-४ जणांना पकडले. पोलिसांच्या एफआयआरनुसार, बेद्रेकडे पिस्तुलातील गोळ्या सापडल्या. उपोषणस्थळी ज्या पुंगळ्या सापडल्या त्या पिस्तुलच्या होत्या हे सुद्धा दाखवतायेत. २४ तासात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. ज्याच्यावर आरोप आहे हे त्यांनी केले. ७० पोलिसांना जखमी केले. त्याला चौकशीसाठीही ठेवणार नाही.एखाद्या पोलिसाला धक्का मारला तर ८ दिवस जेलमध्ये ठेवतील. पिस्तुल सापडले, गोळ्या झाडलेले सिद्ध झाले तरीही सोडले जाते असा आरोप भुजबळांनी केला.
दरम्यान, मला १९३१ चा वर्तमानपत्रातला कागद सापडला, त्यात मराठा बंधूस सूचना, २६ फेब्रुवारी १९३१ रोजी जनगणना होईल. त्यावेळी आपली जात मराठा असे स्पष्टपणे गणतीदारास सांगावी, कुणबी, मराठी सांगू नये. काही मराठा लोक धंद्यावरून जाती सांगतात. त्यांनी धंद्याची जात न सांगता मराठा जात सांगावी. जाणत्या मराठ्यांनी अज्ञानी मराठ्यास ते सांगावे. गणतीदार ते लिहून घेतात की नाही हे सांगावे असा उल्लेख आहे. तेजस्विनी चव्हाण या ताई सांगतायेत, आम्ही जातीवंत मराठा आहे, आम्हाला वेगळे आरक्षण द्या त्यांनाही धमक्या सुरू झाल्या. सगळेच कुणबी झाले तर राज्यात मराठा कुणीच नाही असा सवालही भुजबळांनी केला.